मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या जनजागृतीवर भर द्या : किरण कोवे

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
वाशीम,
Kiran Kove मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गावामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे यांनी केले.
 

Kiran Kove 
कारंजा तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायतीमध्ये ते ग्रामस्थांशी संवाद साधत होते. यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील, गटविकास अधिकारी पुनम राणे, सहाय्यक गटविकास अधिकारी घुगे, बाळकृष्ण अवगण, साखरे आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे समाजशास्त्रज्ञ रविचंद्र पडघान यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविण्यात करिता विभाग प्रमुख व सर्व गटविकास अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. सुकळी या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सहभाग घेतला असून, या अभियानात यशस्वी होण्यासाठी करावयाची तयारी याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की कोणत्याही अभियानात यशस्वी होण्यासाठी गावात मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक माणसाला या अभियानाबाबत माहिती असायला हवी. यासाठी गावातील चौकाचौकात अभियानाचे बॅनर, अभियानात कोणते उपक्रम राबविले जातात याची माहिती देण्यात यावी. दररोज सकाळी दवंडी देण्यात यावी, शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात यावी, बचत गटातील महिला भजनी मंडळ यांच्या सभा घेऊन या अभियानाबाबत चर्चा करण्यात यावी. अभियानात जी उपक्रम राबवायचे आहेत त्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सुकळी गावातील लोकसहभाग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. गावामध्ये असलेली स्वच्छता आणि आजी- आजोबांसाठी तयार करण्यात आलेले ऑक्सिजन पार्क पाहून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोवे यांनी समाधान व्यक्त केले. गावात सुरू असलेल्या घरकुलाच्या कामांची त्यांनी पाहणी केली. तसेच बचत गटातील महिलांशी संवाद साधला.
यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. गावामध्ये जिथे सार्वजनिक सांडपाणी एकत्र येते त्या ठिकाणी परसबाग तयार करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी उपस्थित असलेले सरपंच सविता सुनील वानखडे आणि ग्रामपंचायत अधिकारी नरेश गजभिये यांनी मिळालेल्या सूचनांची तात्काळ अमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले. प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील आणि गटविकास अधिकारी पुनम राणे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.