शिस्त म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षा देणे नव्हे

शिक्षण तज्ञांचा सूर

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
श्याम पांडे
दारव्हा,
Dada Bhuse  विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षक-विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हे, तालुके अथवा केंद्रस्तरावरील परिषदांमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या महिन्यातील शिक्षण परिषदेत ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर किमान 45 मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्यात यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले होते.
 
 

Dada Bhuse 
या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी क्रांती खेडकर व केंद्रप्रमुख विजय काळे यांनी तरुण भारतला दिलेल्या मुलाखतीत सकारात्मक शिस्त म्हणजे विद्यार्थ्यांनी चूक केल्यावर त्यांना शिक्षा देणे नव्हे, तर त्यांच्या वर्तनाचे परिणाम समजावून देत योग्य मार्गदर्शन करणे होय, असे सांगितले.या पद्धतीत विद्यार्थ्यांशी योग्य संवाद साधला जातो. तसेच त्यांच्या भावना समजून घेतल्या जातात. समस्यांवर उपाय शोधण्यास त्यांना प्रवृत्त केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची भावना तसेच निर्णयक्षमता व आत्मज्ञान विकसित होते, असे सांगितले.
तर विविध संशोधनानुसार छडी मारल्यामुळे किंवा दिलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती, मानसिक तणाव व न्यूनगंड तयार होतो. त्याचा थेट परिणाम त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर तसेच व्यक्तिमत्त्व विकासावर होतो. काहीवेळा अशा शिक्षेमुळे विद्यार्थी शाळेपासून दूरवण्याची शक्यता असते, असे त्यांनी सांगितले.
 
 
सकारात्मक शिस्त विद्यार्थ्यांना चुका सुधारण्याची संधी देते. शिक्षक-विद्यार्थी नात्यांमध्ये एक प्रकारचा नवीन विश्वास निर्माण करते. आज अनेक शाळांमध्ये प्रेरणादायी संवाद, समुपदेशन, गटचर्चा, कौतुक, प्रोत्साहन या माध्यमातून शिस्तीचे नियम प्रभावीपणे राबवले जात आहेत. वर्गातील नियम ठरवताना विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे विद्यार्थी ते नियम स्वतःचे मानून त्यांचे पालन करण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारतात, हा एक महत्त्वाचा बदल विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो. शिक्षकांनी आदर्श वर्तनातून शिस्तीचे धडे दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर दिसून येतो. या प्रक्रियेत पालकांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.