कारंजा (घा.),
birsa-munda-auditorium-construction : तालुक्यातील नारा येथे प्रस्तावित बिरसा मुंडा सभागृहाचे बांधकाम जागेच्या मंजुरीअभावी सुरू होऊ शकलेले नाही. संबंधित कामासाठी आवश्यक परवानगी न घेता टेंडर प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर काढण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
या कामासाठी नियुत बेरोजगार ठेकेदार मोहम्मद रेहान रफिक शेख यांनी शासन नियमानुसार २ लाख २७ हजार रुपयांची सुरक्षा ठेव भरली आहे. मात्र, जागेच्या मंजुरीअभावी प्रत्यक्ष बांधकाम सुरू न झाल्याने काम रखडले असून वर्क ऑर्डर अद्याप रद्द करण्यात आली नाही. त्यामुळे ठेकेदाराची मोठी रक्कम शासनाकडे अडकून पडली असून ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सुरक्षा ठेव परत मिळावी म्हणून गेल्या अनेक महिन्यापासून त्यांचे संबंधित कार्यालयाचे उंबरठे झीजवने सुरू आहे.
याप्रकरणी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय अभियंता, कारंजा यांना पत्र देऊन स्पष्ट मत व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, उपविभागीय अभियंत्याकडून अहवाल प्राप्त न झाल्याने पुढील निर्णय प्रक्रिया रखडलेली आहे.
महत्त्वाचे म्हणजे संबंधित टेंडरची वैधता सहा महिन्यांची असताना आता एक वर्षाहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. काम सुरू न होता एवढा कालावधी लोटूनही ना वर्क ऑर्डरबाबत स्पष्ट निर्णय, ना सुरक्षा ठेवीच्या परतफेडीबाबत ठोस भूमिका घेतली गेली नाही.
या पृष्ठभूमीवर ठेकेदार मोहम्मद रेहान शेख यांनी विभागीय आयुतांकडे तक्रार दिली आहे. जागेला मंजुरी नसतानाही टेंडर व वर्क ऑर्डर देणार्या जबाबदार अधिकार्यांवर चौकशी करून कारवाई करावी, तसेच सुरक्षा ठेव परतफेडीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.