तभा वृत्तसेवा
श्रीक्षेत्र माहूर,
Madhav Bhandari, शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना, भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी पक्षात काम करताना काहींना न्याय मिळतो, तर काहींवर अन्याय होतो, हे पूर्वापार चालत आले, अशी स्पष्ट कबुली दिली. ते शुक्रवार, 2 जानेवारी रोजी श्री रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी माहूर येथे आले असता ते बोलत होते.
अन्य प्रश्नांची उत्तरे देताना भाजपामध्ये सध्या इतर पक्षांतून येणाèयांची रिघ लागली आहे. नांदेडमध्ये तब्बल 81 जागांसाठी 531 इच्छुकांनी उमेदवारी मागितली. यावरून भाजपामध्ये काम करण्याची आणि निवडणूक लढवण्याची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे, हे दिसून येते, असे ते म्हणाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार व शरद पवार एकत्र येणे ही स्वाभाविक बाब आहे. आपल्या कार्यकर्त्यांचे भवितव्य लक्षात घेऊन शरद पवार यांनी तसा निर्णय घेतला. आम्ही तिथे पूर्वी त्यांच्याच विरोधात लढलो असल्याने भाजपा कार्यकर्ता भरडला जाणार नसल्याची ग्वाही भंडारी यांनी दिली. आपल्याला विधान परिषदेवर संधी मिळेल का, या प्रश्नावर मी वैयक्तीक प्रश्नांना उत्तर देत नसल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. यावेळी भाजपाचे युवानेते अॅड. रमण जायभाये, तालुकाध्यक्ष नीळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने, तालुका सरचिटणीस विनायक मुसळे, अनिल वाघमारे, नंदकुमार जोशी, विजय आमले, अपील बेलखोडे, रामकृष्ण केंद्रे, नीलेश तायडे यांची उपस्थिती होती.