सावित्रीबाई फुले पुतळा हटवल्याने यवतमाळात पडसाद

-महात्मा फुले चौकात निषेध सभा -पुतळ्याच्या जागेवर तैलचित्र लावून प्रार्थना

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
protest-meeting : स्टेट बँक चौकात 2 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्यात आला होता. नगरपरिषद प्रशासनाने हा पुतळा अनधिकृत असल्याचे कारण देत काही तासातच काढून नेला. या घटनेचे शनिवारी यवतमाळ शहरात पडसाद उमटले.
 
 
y4Jan-Nishedh
 
यासंदर्भात महात्मा फुले चौक येथे निषेध सभा घेऊन प्रशासनाच्या कृतीबाबत संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महिलांचा मोर्चा थेट स्टेट बँक चौक येथे धडकला. त्या पुतळ्याच्या ठिकाणी सावित्रीबाईचे तैलचित्र लावून सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. पालिका प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने हटविलेला पुतळा तेथे पूर्ववत बसवावा, अशी मागणी यवतमाळ येथील फुले, शाहू, आंबेडकर यांचे अनुयायी, समस्त सामाजिक संघटना पदाधिकाèयांनी केली आहे.
 
 
सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी असल्यामुळे अनुयायांनी पुतळा बसविला. परंतु प्रशासनाने हा पुतळा हटविल्याचा आरोप निवदेनातून केला आहे. तसेच या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याची व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा पुन्हा त्या ठिकाणी बसविण्याची मागणी निवदेनातून केली आहे. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
 
 
महात्मा फुले चौकातील निषेध सभेला आमदार बाळासाहेब मांगूळकर, ज्ञानेश्वर गोबरे, संतोष ढवळे, उमेश मेश्राम, माया गोबरे, प्रा. सविता हजारे, सुनयना येवतकरसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या पुतळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व यवतमाळ नगरपरिषद मुख्याधिकाèयांनी नाहरकत प्रमाणपत्र सुद्धा दिले आहे. याच नाहरकत प्रमाणपत्राच्या आधारावर पुतळा बसविला होता. असे यावेळी सांगण्यात आले.