पुणे,
Ravindra Dhangekar महायुतीच्या जागावाटपावरून पुण्यात भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यातील तणाव आता उघड संघर्षात बदलताना दिसत आहे. शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत थेट आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या वक्तव्यामुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले?
“मी पहिल्याच दिवशी Ravindra Dhangekar सांगितले होते की हे लोक शिवसेनेला फसवणार आहेत. युती होणार नाही, हे मी आमच्या कार्यकर्त्यांना वारंवार सांगत होतो,” असा आरोप धंगेकर यांनी केला. शेवटच्या दहा मिनिटांत एबी फॉर्म पोहोचवायलाही वेळ मिळाला नाही, एवढे गाफील आम्हाला ठेवण्यात आले, असे सांगत भाजप विश्वासाला पात्र राहिला नसल्याची टीका त्यांनी केली. या गोंधळामुळे शिंदे सेनेला अपेक्षित १६५ उमेदवार उभे करता आले नाहीत आणि केवळ ११० उमेदवार रिंगणात उतरवावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले.महायुती होईल, अशी शक्यता अखेरपर्यंत असताना भाजपकडून कमी जागा देण्यात आल्या आणि अनेक मतदारसंघांत सन्मानजनक तोडगा न निघाल्याचा आरोप करत शिंदे सेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता दोन्ही पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप चव्हाट्यावर आले आहेत.
धंगेकर यांनी पुणे शहरातील भाजप नेतृत्वावर थेट हल्ला चढवत, “पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व मंगळसूत्र चोर करत आहेत, हे पुणेकरांचे दु:ख आहे,” असा खळबळजनक आरोप केला. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही फसवले असल्याचा दावा त्यांनी केला. मंगळसूत्र चोराचे नेतृत्व पुणेकर कधीही मान्य करणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.भाजपमध्ये आयात नेत्यांना महत्त्व दिले जात असून कार्यकर्ते संपत चालले आहेत, असा आरोप करत धंगेकर म्हणाले की, खरे नेतृत्व करण्याची ताकद शिवसेनेतच आहे. “नेतृत्व करणारा पक्ष जर कोणता असेल तर तो शिवसेनाच आहे,” असा दावाही त्यांनी केला.
भेट घेणार
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण Ravindra Dhangekar यांच्याबाबत बोलताना धंगेकर म्हणाले, “ते राज्याचे नेते आहेत, त्यांच्यावर काय बोलणार; मात्र सत्तेसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असू शकते.” आगामी काळात १६ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगली भेट देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी अजित पवार यांचे कौतुक केले.भाजपने ज्यांच्या हाती पुण्याचे नेतृत्व दिले आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि पैसे खाण्याचे आरोप करत धंगेकर यांनी आपली टीका अधिक तीव्र केली. या वक्तव्यांमुळे भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.