तभा वृत्तसेवा
पुसद,
mla-cup-badminton-tournament : पुसद येथे आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धेचे 3 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे उद्घाटन पार पडले. शहरासह परिसरातील क्रीडाप्रेमी, खेळाडू व नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर पुसद बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष डॉ. दयाराम जाधव, विश्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष निशांत बयास, नवनिर्वाचित नगरसेवक शिल्पा देशमुख, अभिजीत पानपट्टे व निखिल गादेवार उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल यांनी क्रीडा संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत, खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहते. आजच्या धकाधकीच्या जीवनात युवकांसह महिलांनीही विविध खेळांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. दयाराम जाधव यांनी शहरातील क्रीडा सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधले. पुसद शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ एकच बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध आहे. त्या कोर्टावर इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले जात असल्याने विद्यार्थ्यांना व खेळाडूंना नियमित सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नवीन बॅडमिंटन कोर्टची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दिग्रस व उमरखेडप्रमाणे पुसद येथेही आधुनिक व सुसज्ज बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
या आमदार चषक स्पर्धेत हैदराबाद, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, दिग्रस, हिंगोली, यवतमाळ तसेच पुसद येथील संघांनी सहभाग नोंदवला असून, राज्यातील नामवंत खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत येणार आहे.
यावेळी ईशान चव्हाण, अभिजीत बासटवार, मंगेश मुगवानकर, कौस्तुभ पांडे, रितेश मुगवानकर, मनीष दशरथकर यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.