२० वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात; उद्धव ठाकरेंसोबत ‘वचननामा’ जाहीर

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
मुंबई,  
raj-thackeray-at-shiv-sena-bhavan महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. तब्बल २० वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात प्रवेश केला. आगामी २०२६ च्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती जाहीर केली असून, याच निमित्ताने दोन्ही नेत्यांनी संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध केले. या घोषणापत्रात मुंबईच्या विकासासंदर्भात अनेक मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले की, मुंबईचा महापौर हा मराठीच असेल.
 
raj-thackeray-at-shiv-sena-bhavan
 
घोषणापत्र सादर करताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, अध्यक्ष आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असून स्वतःला संरक्षण देत इतरांचे संरक्षण काढून घेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे नार्वेकर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आणि अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीने निष्पक्ष राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. raj-thackeray-at-shiv-sena-bhavan उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी मंत्र्यांवरही टीका करत सांगितले की, अनेक मंत्री अजूनही शासकीय ताफ्यासह प्रचार करत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला सत्तेच्या दबावाखाली न येण्याचे आवाहन केले. तसेच, १५ हजार कोटींच्या अर्थसंकल्पातून तब्बल ३ लाख कोटींची कंत्राटे ठेकेदारांना देण्यात आली असून, त्याच पैशांचा वापर निवडणुकीत केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांनीही यावेळी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहारसारखे बनवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची ओळख होण्यापूर्वीच कोस्टल रोडचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. raj-thackeray-at-shiv-sena-bhavan निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, जर खरोखरच निष्पक्षता असेल तर उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचे मोबाइल कॉल रेकॉर्ड तपासण्याचे आव्हानही त्यांनी दिले. या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.