केंद्रीय राज्यमंत्री शोभा करांदलाजे घेणार एमगिरीच्या कार्याचा आढावा

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
वर्धा,
Shobha Karandlaje महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी), वर्धा येथे केंद्रीय राज्यमंत्री शोभा करांदलाजे सोमवार ५ रोजी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामोद्योग सक्षम करण्यासाठी एमगिरीकडून करण्यात येत असलेल्या कार्यांचा आढावा घेणार असल्याची माहिती एमगिरीचे निर्देशक डॉ. मुरकुटे यांनी दिली.
 
Shobha Karandlaje
 
एमगिरीच्या खादी व वस्त्रोद्योग विभाग, जैव प्रक्रिया व औषधी वनस्पती विभाग, रासायनिक ग्रामोद्योग विभाग, शिल्प व अभियांत्रिकी विभाग, ग्रामीण ऊर्जा व पायाभूत सुविधा विभाग तसेच व्यवस्थापन व प्रशासकीय विभागांना भेट देऊन या विभागांद्वारे विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची पाहणी करतील. तसेच शास्त्रज्ञांशी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांवर चर्चा करून नव्या प्रकल्पांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
एमगिरी केंद्र सरकारच्या एमएसएमई मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली राष्ट्रीय व स्वायत्त संस्था असून गांधीवादी विचारसरणीवर आधारित ग्रामोद्योग विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करणे आणि त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी कार्यरत आहे. या वर्षात एमगिरीमार्फत देशात रोजगारनिर्मिती आणि कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी आतापर्यंत ८४ कौशल्य/उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच क्षेत्रीय चाचणीसाठी २४ तंत्रज्ञान व ३० नावीन्यपूर्ण उत्पादने/प्रक्रिया विकसित करण्यात आल्या आहेत. एमगिरीकडून विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा विस्तार लेह-लडाखपासून ते देशाच्या ईशान्येकडील दुर्गम भागांपर्यंत होत आहे.
एमगिरीने सोलर पॉवर पॅक आणि पोर्टेबल सोलर पॉवर्ड बॅटरी चार्जर हे तंत्रज्ञान विकसित करून भारतीय सेनेला हस्तांतरित केले असून त्याचा उपयोग भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरमध्ये केला. लेह-लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणार्‍या सिबकथॉर्न फळांच्या काढणीसाठी विशेष हार्वेस्टिंग उपकरण विकसित करण्यात आले आहे. लेह-लडाखच्या फलोत्पादन विभागाच्या समन्वयाने एमगिरीमार्फत एप्रिकॉट सोलर ड्रायर तसेच सुगंधी वनस्पती लेव्हेंडर व आर्टिमीजिया यांपासून इसेंशियल ऑइल निष्कर्षणाचा पायलट प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे. एमगिरीने खादी सूत (यार्न) यांचे मानकही तयार केले असून त्यास ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सकडून मानक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
एमएसएमई मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत एमगिरीमार्फत फेब्रुवारी महिन्यात देशातील ४० निवडक गोशाळांच्या प्रतिनिधींना पंचगव्य उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशातील गोशाळा आत्मनिर्भर व सक्षम करण्याच्या उद्देशाने या योजनेंतर्गत आतापर्यंत एमगिरीमार्फत ४०० गोशाळा प्रतिनिधींना पंचगव्य उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शोभा करांदलाजे एमगिरी येथे नव्या प्रकल्पांचे उद्घाटनही करणार असल्याचेही डॉ. मुरकुटे यांनी सांगितले.