सिंदीतील नवनिर्वाचितांपुढे समस्यांचा डोंगर!

*अग्रक्रमाने सर्वांगीण विकासाचा श्रीगणेशा अपेक्षित

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
नरेंद्र सुरकार
सिंदीरेल्वे,
mayor-corporator : नगर पालिका निवडणुकीत निवडून आलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांपुढे शहरातील अगणित समस्यांचा डोंगर आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचे वचन निवडणूक लढताना सर्वांनीच दिल्याने हा डोंगर सर करण्याची कसरत सर्वांनाच करावी लागणार आहे. तब्बल चार वर्षानंतर मिळालेल्या लोकप्रतिनिंधीकडून सिंदीरेल्वेच्या विकासाचा श्रीगणेशा सिंदीकरांना अपेक्षित आहे.
 
 
 
KL
 
 
 
शहराची सर्वात मोठी समस्या पाणी पुरवठा यंत्रणेची आहे. त्यासाठी पक्षभेद विसरुन एक दिलाने निर्णय घ्यावा लागेल अर्थात त्याकरिता विरोधकांना देखील सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे असेल. शहराला तालुयाचा दर्जा मिळावा याबद्दल यापूर्वीच एकमत होते आणि आजही जनता मोठ्या अपेक्षेने लोकप्रतिनिधींकडे बघत आहे. त्याची सर्व नवनिर्वाचितांना जाण आहेच!
 
 
शहरातील जुन्या आरोग्य केंद्रात नवीन ईमारती झाल्या. पण, येथे ग्रामीण रुग्णालय व्हायला हवे. त्याशिवाय रुग्णसेवेला गती मिळणार नाही आणि या सेवाभावी यंत्रणेची प्रगती अशय आहे. त्यासाठी आ. कुणावार यांनी पाठीशी राहून घोशा लावावा लागेल. बस स्थानक नावाचेच आहे, तेथे पेयजल उपलब्ध करणे, अतिक्रमण हटविणे आणि शय असल्यास बस आगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हिंगणघाट, वर्धा, नागपूर, उमरेड वगळता राष्ट्रीय महामार्ग ४४ वर कोठेही बस आगार नाही. त्यामुळे एस. टी. महामंडळास हे शहर सोयीचे ठरते. दोन दशकापूर्वी येथे तीन जिनिंग युनिट कार्यरत होते. रोज बाजार समितीच्या आवारात हजारो कापूस गाड्यांची आवक असायची. आता फक्त एकच युनिट सुरू आहे. त्यामुळे विशेष करुन महिला मजुरांच्या हातांना काम नाही. त्या समस्येची तड लावण्याकरिता नगराध्यक्षाने प्रयत्न करावे अशी महिलांची अपेक्षा आहे.