तभा वृत्तसेवा
पुसद,
missing-young-man : विठाळा वार्डातील बेपत्ता असलेल्या एका युवकाने विहिरीत आत्महत्या केल्याची घटना 3 जानेवारीला सकाळी उघडकीस आली. योगेश जामुंतराव ढाले (वय 21), विठाळा वार्ड पुसद असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, योगेशचे वडील आजाराने ग्रस्त असल्याने त्यांचा 2 जानेवारीला मृत्यू झाला होता. त्यानंतर योगेश हा घरून बेपत्ता झाल्याने त्याचा शोध रात्री 9 वाजेपर्यंत घेण्यात आला. मात्र योगेश काही सापडला नाही. मृत्यू झालेल्या वडिलांचा अंत्यविधी करण्यास विलंब होत असल्याने रात्री 9 च्या दरम्यान त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
त्यानंतरही योगेश काही सापडला नाही. अखेर सकाळी 7 च्या सुमारास वार्डाजवळ असलेल्या रामायण नगरीतील विहिरीत त्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. वडीलापाठोपाठच मुलाचाही मृत्यू झाल्याने शंका कुशंकेला उधाण आले होते. योगेशच्या मागे आई, एक भाऊ असा परिवार आहे.