गोंदिया,
Wild bison attack शेतातून घरी परत जाणार्या शेतकर्यावर रानगव्याने हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक शेतकरी जखमी झाल्याची घटना आज, ४ जानेवारी रोजी गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव शेतशिवारात सकाळच्या सुमारास घडली. निलाराम तुरकर (५५) असे मृत शेतकर्याचे तर सीताराम पटले असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
निलाराम तुरकर हे नेहमीप्रमाणे सोनेगाव ते शहारवाणी दरम्यान असलेल्या त्यांच्या शेतात शेतीचे काम व जनावरांना पाणी देण्यासाठी गेले होते. शेतातील काम आटोपल्यावर ते घरी परत जात असताना झुडपीत असलेल्या रानगव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात रानगव्याचे शिंग पोटात गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जवळच असलेल्या सीताराम पटले यांच्यावरही रानगव्याने हल्ला केला. परंतु तेथून दुचाकीने जात असलेल्या तेजराम ठाकरे यांनी आरडाओरडा केल्याने रानगवा पळून गेला. मात्र, तोपर्यंत रानगव्याच्या हल्ल्यात सिताराम पटले जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते सदर रानगवा जवळील चिचगावटोला, कवलेवाडा परिसरात गेल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.