यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन उत्साहात

2 हजार 800 धावपटूंचा सहभाग

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-health-marathon : शहराची आरोग्यविषयक ओळख ठरलेली यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनची चौथी आवृत्ती नेहरू स्टेडियम येथे उत्साहात पार पडली. या मॅरेथॉनमध्ये तब्बल 2 हजार 800 हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
 
 
 
y4Jan-Marathon
 
 
 
या मॅरेथॉनमध्ये 21 किमी, 10 किमी, 5 किमी फिटनेस रन, 3 किलोमीटर फन रन तसेच लहान मुलांसाठी स्वतंत्र 5 किमी चिल्ड्रन्स रन असे विविध प्रकार ठेवण्यात आले होते. मॅरेथॉनची सुरुवात नेहरू स्टेडियम येथून होऊन तहसील चौक, एलआयसी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक चौक मार्गे धामणगाव मार्गावरील करळगाव घाटातील वाघाई मंदिराजवळ यू-टर्न घेऊन पुन्हा नेहरू स्टेडियम असा होता.
 
 
सकाळी 5 वाजताच धावपटू आणि नागरिकांची मोठी गर्दी नेहरू स्टेडियमच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली होती. 5.30 वाजता संगीतासह झुंबा व स्ट्रेचिंग सेशन पार पडले. त्यानंतर विविध अंतराच्या स्पर्धेनुसार ठरलेल्या वेळेनुसार फ्लॅग-ऑफ देण्यात आला.
 
 
या मॅरेथॉनचे विशेष आकर्षण म्हणजे यवतमाळचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः 21 किमी हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. विविध शर्यतींना मुख्य अतिथी निवासी जिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार योगेश देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, भापोसेचे सारडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. यवतमाळ पोलिस दलातील जवळपास 600 पोलिस मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. पोलिस अधीक्षक कुमार चिंता व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
 
 
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अमरावती, वर्धा, बुलढाणा, हिंगोली, गडचिरोली, पुसद व आजूबाजूच्या शहरांमधील विविध रनिंग ग्रुप्सनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.