हिंगणघाट,
Ek Ratra Kavitechi, ‘एक रात्र कवितेची’ या विनोद व प्रबोधनाने ओतप्रोत भरलेल्या काव्य मैफलीचे आयोजन लोकसाहित्य परिषदेच्या वतीने हिंगणघाट येथे शनिवार १७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.स्थानिक हरिओम सभागृहात मकर संक्रातीच्या मुहूर्तावर आयोजित ही काव्य मैफल संध्याकाळी ६ वाजता सुरू होणार असून या काव्य संमेलनात महाराष्ट्रातील दिग्गज कवी सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध कवयित्री, गझलकार व समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ पुणे, महाराष्ट्रभर सामाजिक माध्यमावर ज्यांच्या कवितांनी धुमाकूळ घातला अशा प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील जळगाव, आपल्या कविता व किस्स्यांनी रसिकांना मनमुराद हसविणारे प्रशांत भोंडे, अकोला, परतवाडा येथील संवेदनशील कवी गजानन मते सहभागी होणार असून मैफलीचे खुमासदार निवेदन व संचालन अकोला येथील प्रसिद्ध गझलकार, कवी गोपाल मापारी हे करणार आहेत.
लोकसहित्य परिषद गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने हा कार्यक्रम आयोजित करीत आहे. याच कार्यक्रमात स्व. प्रा. रवींद्र ठाकरे यांच्या स्मृती निमित्त देण्यात येणारा शंकर बडे वर्हाडी मायबोली सन्मान परतवाडा येथील संवेदनशील व शेतकर्यांच्या व्यथा आपल्या कवितेतून महाराष्ट्रभर मांडणारे, वर्हाडी बोलीला सन्मान मिळवून देणारे कवी गजानन मते यांना प्रदान करण्यात येणार आहे.
मकर संक्रातीच्या मुहूर्तावर आयोजित या काव्य मैफलीला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकसहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.