हैद्राबाद,
Actor Kannan Pattambi has passed away दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेता आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्मिती नियंत्रक कन्नन पट्टाम्बी यांचे गंभीर आजारामुळे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. रविवारी, ४ जानेवारी रोजी रात्री उशिरा पलक्कड जिल्ह्यातील पट्टाम्बी येथील न्यांगथिरी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री सुमारे ११ वाजून ४१ मिनिटांनी त्यांचे निधन झाले.
या दुःखद घटनेची माहिती त्यांचे मोठे भाऊ, प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक मेजर रवी यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या धाकट्या भावाच्या निधनाला दुजोरा दिला असून, कन्नन यांनी चित्रपटसृष्टीत निर्मिती नियंत्रक म्हणून मोठे योगदान दिल्याचे नमूद केले. तसेच, सोमवारी दुपारी ४ वाजता पट्टाम्बी येथील त्यांच्या घरी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कन्नन पट्टाम्बी गेली जवळपास तीन दशके मल्याळम चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. पडद्यामागे निर्मिती विभागात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीच, शिवाय अभिनेता म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. प्रसिद्धीपासून काहीसे दूर राहत त्यांनी अनेक मोठे चित्रपट सुरळीत पार पाडण्यात मोलाची मदत केली. अभिनेता म्हणून त्यांनी सुमारे २३ मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले असून त्यापैकी अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबतही त्यांनी विविध चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या.