आलापल्लीत विज्ञानाचा जागर!

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
अहेरी,
Alapalli science rally, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथे 3 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान ‘डॉ. होमी जहांगीर भाभा विज्ञान नगरी’त अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा वांगेपल्ली येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन होत आहे. त्यानिमित्ताने 3 जानेवारी रोजी शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास आलापल्लीच्या क्रीडा संकुल येथून विज्ञान दिंडी काढण्यात आली होती. भविष्यातील वैज्ञानिक घडवण्याच्या उद्देशाने आणि विज्ञानाचा प्रसार तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवने हा विज्ञान दिंडीचा उद्देश होता. या दिंडीच्या माध्यमातून बालवैज्ञानिकांनी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या, ज्यामुळे संपूर्ण आलापल्ली नगरी विज्ञानाच्या रंगात न्हाऊन निघाली होती.
 

Alapalli science rally 
विज्ञान दिंडीचे उद्घाटन सरपंच शंकर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चरणजितसिंह सलूजा, गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार, मुख्याध्यापक गजानन लोणबले, प्राचार्य जी. महेश, मुख्याध्यापिका सरिता, मुख्याध्यापक संजय कोडेलवार, प्राचार्य शाहिद, प्राचार्य विशाल बंडावार, मुख्याध्यापिका सिस्टर जिसमेरी आदी उपस्थित होते.
 
 
या सोहळ्याचे मुख्य Alapalli science rally, आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सजवलेली दिंडी. पारंपरिक वारकरी दिंडीचा बाज राखत, विज्ञानातील विविध तत्त्वे, पर्यावरण रक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे संदेश देणारे फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी शहरातून फेरी काढली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरातील मुख्य रस्ते विज्ञानाच्या जयघोषाने दुमदुमले होते. या उपक्रमांतर्गत केवळ दिंडीच नाही, तर बालवैज्ञानिकांच्या नवकल्पनांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने * शाश्‍वत ऊर्जा : सौर ऊर्जा आणि पवन उर्जेचा प्रभावी वापर, पर्यावरण संवर्धन : प्लास्टिकमुक्ती आणि वृक्षारोपणाचे महत्त्व, आधुनिक शेती : शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याच्या पद्धती, स्वच्छ भारत अभियान : कचरा व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी जनजागृती या विषयांवर विद्यार्थ्यांनी लक्षवेधी प्रकल्प सादर केले.
या विज्ञान दिंडीत परिसरातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आकर्षक वेशभूषा, वैज्ञानिक घोषणा आणि विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील उत्साह यामुळे हा सोहळा नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आलापल्लीच्या इतिहासात विज्ञानाचा असा जागर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला.
 
 
उपक्रमाचे महत्त्व
 
 
अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अशा प्रकारच्या ’विज्ञान दिंडी’चे आयोजन अत्यंत प्रभावी ठरत आहे. या दिंडीच्या यशाबद्दल आयोजकांचे आणि सहभागी बालवैज्ञानिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रीडा संकुल आलापल्ली ते मुख्य चौक आलापल्ली येथून मार्गक्रम करत राणी दुर्गावती शाळा आलापल्ली येथे सदर दिंडीचे समापन झाले.