मुंबई
cold drinks देशभरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर लोक थंड पेयांकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. घरगुती कार्यक्रम असो किंवा पाहुणचार, कोल्ड ड्रिंक देण्याची प्रथा सर्वत्र वाढली आहे. मात्र, या कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
सध्या अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत शरीराची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः आहारात योग्य बदल करून शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात.कोल्ड ड्रिंक तहान भागवते, ही समजूत चुकीची आहे. प्रत्यक्षात या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, तसेच काही पेयांमध्ये कॅफिनही असते, जे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करू शकते. त्यामुळे शरीर डिहायड्रेट होण्याचा धोका वाढतो. यासोबतच चिप्सचे सेवन केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात मीठ आणि ट्रान्स फॅट असते, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते.
तज्ज्ञांच्या मते, या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्यास शरीरातील पाण्याची कमतरता अधिक वाढते आणि थकवा, अशक्तपणा किंवा इतर आरोग्य समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. नियमितपणे असे सेवन केल्यास लठ्ठपणा वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
याऐवजी, उन्हाळ्यात cold drinks नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरते. शहाळ्याचे पाणी, लिंबूपाणी यांसारखी पेये शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स पुरवतात आणि हायड्रेशन टिकवून ठेवतात. तसेच घरी तयार केलेले ओआरएस द्रावणही उपयुक्त ठरू शकते. तज्ज्ञांच्या सूचनेनुसार, एक लिटर पाण्यात सहा चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ मिसळून दिवसभरात थोड्या-थोड्या प्रमाणात ते पिणे फायदेशीर ठरते.
याशिवाय, चिप्सऐवजी भाजलेले मखाणे किंवा हंगामी फळे जसे की टरबूज आणि खरबूज यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि उष्णतेपासूनही संरक्षण मिळते.दरम्यान, तज्ज्ञांनी नागरिकांना तहान लागण्याची वाट न पाहता नियमितपणे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाईल आणि उन्हाळ्यातील आरोग्य समस्यांपासून बचाव होईल.