अहेरी,
Dharmarao Atram आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात विज्ञानाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून नवनवीन प्रयोग करावेत, तरच देश प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने, अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, उपशिक्षणाधिकारी अमरसिंह गेडाम, डायटचे प्राचार्य बळीराम चौरे, गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार, वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांनी केले. त्यांनी या प्रदर्शनीमागचा मुख्य हेतू आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल माहिती दिली. उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक प्रतिकृतींचे (मॉडेल्स) बारकाईने निरीक्षण केले. जिल्हाभरातून आलेल्या शेकडो बाल वैज्ञानिकांनी पर्यावरण, ऊर्जा बचत आणि आधुनिक शेती अशा विविध विषयांवर उत्कृष्ट मॉडेल्स सादर केले होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या कल्पकतेचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे, 3 जानेवारी व 4 जानेवारी रोजी सकाळी आलापल्ली, अहेरी या दोन्ही गावांमध्ये विज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे अहेरी तालुक्यात विज्ञानमय वातावरण निर्माण झाले आहे.