तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
Government Vidyaniketan Kelapur शासकीय विद्यानिकेतन केळापूर येथील विद्यार्थ्यांशी ‘करियर व्यक्तिमत्व विकास व नव्या काळातील नव्या संधी’ या विषयावरील मार्गदर्शन सत्रात थेट साता समुद्रापलीकडून अमेरिकेतील मिशिगन प्रांतातून माजी विद्यार्थी डॉ. भास्कर हलामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. केवळ पाठ्यक्रम अभ्यासक्रमाच नाही तर मुलांचा सर्वांगीण विकास होऊन आत्मविश्वास वाढावा यासाठी शासकीय विद्यानिकेतन केळापूर येथील प्राचार्य धम्मरत्न वायवाड यांच्या कल्पकतेतून विविध चाकोरी बाहेरील उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून माजी विद्यार्थ्यांची स्नेह भेट येथील विद्यार्थ्यांशी घडवून आणली.
तर डॉ. सतीश कोडापे, लालमन पवार, किरण पवार, गजानन वाघमारे, दिवाकर मडावी, सागर प्रतापवार या माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना ब्लँकेट, क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच या उपक्रमांतर्गत 26 डिसेंबर रोजी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचे डॉक्टरेट असलेले औषधी संशोधन क्षेत्रात वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. भास्कर हलामी यांनी नव्या युगातील करिअरच्या संधी यावर तब्बल एक तास मार्गदर्शन केले. ते शासकीय विद्यानिकेतन केळापूर येथील 1994 च्या तुकडीतील दहावी उत्तीर्ण होते. त्यांनी गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील चिरखेडा या छोट्याशा गावातून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून केळापूर येथे शिक्षण घेऊन अमेरिकेसारख्या देशात नावलौकिक मिळवला आहे. या संवादातून मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासोबतच त्यांना नवी दिशा मिळाणार आहे.
यासाठी माजी विद्यार्थी संघटना शासकीय विद्यानिकेतनचे अध्यक्ष योगेश उघडे, कुलप्रमुख आतिश दुर्वे, शिक्षक कपिल दगडे, सुशील माडपेल्लीवार, मंगेश यमसनवार, रवी कुमरे, गजानन कोटरंगे, सुजाता बंडेवार, योगिता पवार व गेडाम यांनी प्रयत्न केले.