वर्धा,
Mahajyoti राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन उपलब्ध झाले पाहिजे, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी बार्टी, सारथीच्या धर्तीवर महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या मदतीचे आपले चांगले आयुष्य घडवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
इतर मागास बहुजन कल्याण तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्यावतीने जेईई, नीट, एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट तसेच महात्मा फुले यांच्या वाङमयाचे पुस्तक संच वितरित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक किशोर भोयर, करिअर पॅाईंट कोटाचे समीर देशमुख उपस्थित होते.
मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्थापना केली. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील उत्तम दर्जाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी महाज्योतीची निर्मिती करून घरबसल्या विद्यार्थ्यांना चांगली कोचिंग दिली जात आहे. खाजगी कोचिंग अतिशय महागडी आहे. प्रत्येकच पालक आपल्या मुलांना अशी शिकवणी देऊ शकत नाही. महाज्योतीच्या माध्यमातून चांगली कोचिंग देण्याचे पालकांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे पालकमंत्री भोयर म्हणाले.राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राज्य शासनाने सुरू केल्या आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देण्यासाठी तालुकास्तरावरील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सी. व्ही. रमण विज्ञान केंद्र नागपूर येथे तर जिल्हास्तरावरील उत्कृष्ट बालवैज्ञानिकांना बंगळूरू येथील इस्त्रोच्या सेंटरला भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यातील उत्कृष्ट ५१ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा या संस्थेला भेट देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
प्रत्येकच विद्यार्थ्याला इंजिनियर, डॉटर किंवा उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे, अशी इच्छा असते. यासाठी त्यांना चांगले कोचिंग महाज्योतीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. माझ्या पालकांनी अगदी लहान वयापासून माझ्यात शिक्षणाचे महत्व रुजविले. आईने शिक्षणावर फोकस करण्यास नेहमीच प्रोत्साहन दिले. प्रत्येकाने आपले आयुष्य घडवताना आपल्या ध्येयाकडे लक्ष दिले पाहिजे, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले.याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सहाय्यक संचालक किशोर भोयर यांनी केले.दरम्यान, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व मान्यवरांच्या हस्ते जिल्हाभरातून आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.