सिंधुदुर्ग,
Narayan Rane hints at political retirement महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणेंच्या एका जाहीर सभेतील वक्तव्याने जोरदार चर्चा सुरू केली आहे. सिंधुदुर्गच्या कणकवलीत नगरपंचायत निवडणुकीनंतर झालेल्या सभेत राणेंनी त्यांच्या राजकीय भविष्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले, आपण आता ठरवलंय, आता घरी बसायचं. या वक्तव्यामुळे असे संकेत मिळाले की राणे सक्रिय राजकारणातून हळूहळू निवृत्तीच्या दिशेने वळत आहेत.
सभेत राणेंनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक थेट पैलू देखील प्रकट केला. त्यांनी सांगितले की, नारायण राणे आजही रस्त्यावर भाजी घेतो. हातात अंगठ्या आणि काळी काच असणाऱ्या गाड्या घालून काहीजण येतात. माझ्या गाडीला काळी काच नाही. माणुसकीच माझा धर्म आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आलेल्या अडचणी आणि कटकारस्थानांबद्दलही बोलत, म्हणाले की त्यामुळे आता त्यांनी निवृत्तीचा विचार केला आहे.
राणेंनी पुढे सांगितले की, पैशांसाठी राजकारण करू नका आणि त्यांच्या नंतर विकासात्मक काम निलेश आणि नितेश करतील. त्यांनी महायुतीच्या समर्थकांना आवाहन केले, "द्वेष, रोषाच्या राजकारणाला थारा देऊ नका, पक्ष सांभाळा, स्वार्थ नको." लोकसभेत मिळालेल्या विजयाबाबत आणि सिंधुदुर्गातील नागरिकांच्या प्रेमाबद्दल त्यांनी आभार मानले. जाहीर सभेत राणेंच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, नारायण राणे सक्रिय राजकारणातून हळूहळू पाय मागे घेत आहेत का. जरी त्यांनी अधिकृत निवृत्तीची घोषणा केली नसली तरी, त्यांच्या शब्दांमधून हा संदेश स्पष्ट दिसून आला.