डेहराडून,
New rules for weddings in Uttarakhand उत्तराखंडमधील विकासनगर परिसरातील सिलगाव खाट गावाने लग्न आणि सामाजिक कार्यक्रमांबाबत अत्यंत कडक नियम लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाढता खर्च, दिखाऊ थाटामाट आणि पारंपरिक मूल्यांपासून होणारे विचलन रोखण्यासाठी गावकऱ्यांनी एकमताने हे नियम ठरवले असून ते जून २०२६ पासून लागू होणार आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. स्याना तुलसी राम शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हे सर्व निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, सिलगाव खाटमधील कोणत्याही कुटुंबाने विकासनगर किंवा इतर ठिकाणी जाऊन लग्नाचे आयोजन करू नये, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित कुटुंबाकडून थेट एक लाख रुपयांचा दंड वसूल केला जाईल.

तसेच, जर लग्न इतर ठिकाणी पार पडल्यानंतर गावात वेगळी पार्टी आयोजित करण्यात आली, तर त्या कार्यक्रमाला फक्त संबंधित कुटुंबातील सदस्यांनाच उपस्थित राहण्याची मुभा असेल. गावातील इतर कोणीही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. या नियमाचे उल्लंघन झाल्यास कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड आणि सहभागी झालेल्या गावकऱ्यांसाठी गावावर ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. लग्न, बिसू मेळे आणि खाट समाजाच्या उत्सवांमध्ये महिलांच्या दागिन्यांवरही मर्यादा घालण्यात आली आहे. महिलांना केवळ कानातले, नाकाची अंगठी, मंगळसूत्र, पायल आणि अंगठ्या एवढ्याच दागिन्यांची परवानगी देण्यात आली आहे. हुंडा प्रथेला आळा घालत, हुंड्यात फक्त पाच वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये एक बंठा, एक प्लेट, एक वाटी आणि एक डबा यांचा समावेश आहे.
लग्न समारंभात डीजे वाजवण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, फक्त मायक्रोफोन आणि पारंपरिक डोंगरी बँड वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. जेवणाच्या बाबतीतही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. मोमोज, चौमीन, टिक्की, गोलगप्पे, फळे यांसारख्या फास्ट फूड पदार्थांना सक्त मनाई करण्यात आली आहे. जेवणानंतर फक्त रसगुल्ला किंवा जलेबी देण्याचीच परवानगी असेल. बिअरवर पूर्ण बंदी घालण्यात आली असून, दारूसोबत केवळ काकडी, मुळा, गाजर, चिकन आणि चणे देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महिलांना रैनी मेजवानीत सहभागी होण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र, मेजवानीला उपस्थित राहणाऱ्या महिलांना जेवणानंतर अर्धा किलो मिठाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीका किंवा धूप अर्पणाच्या नावाखाली कोणतीही आर्थिक भेटवस्तू देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, कोणत्याही दुःखद घटनेनंतर महिलांनी नातेवाईक किंवा कुटुंबीयांच्या घरी जाण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सिलगाव खाटच्या ग्रामस्थांनी हे सर्व नियम एकमताने स्वीकारले असून, समाजात साधेपणा, समानता आणि पारंपरिक मूल्ये जपण्यासाठी हे निर्णय अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.