पाकिस्तानात अटक झालेली सरबजीत कौर भारतात परतणार

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Sarbjit Kaur will return to India लग्नासाठी पाकिस्तानात गेलेल्या पंजाबमधील सरबजीत कौरला तेथील सुरक्षा यंत्रणांनी अटक केली असून, तिला अटारी सीमेवरून भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरबजीत कौरसोबत तिचा पाकिस्तानी पती नासिर हुसेन यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पाकिस्तानच्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी पंजाब सरकारचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री रमेश सिंग अरोरा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. अरोरा यांनी सांगितले की, ४ जानेवारी २०२६ रोजी गुप्तचर विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने नानकाना साहिबजवळील पेहरे वाली गावात कारवाई करत सरबजीत कौरला ताब्यात घेतले. तिच्यासोबत तिचा पती नासिर हुसेनलाही अटक करण्यात आली. सरबजीतचा पाकिस्तानमधील व्हिसा संपला असूनही ती तेथे बेकायदेशीररीत्या राहत होती. त्यामुळे तिला भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आजच तिची भारतात रवानगी होण्याची शक्यता आहे.
 
 

nasir kour 
सरबजीत कौर ही पंजाबमधील कपूरथळा जिल्ह्यातील अमानीपूर गावची रहिवासी आहे. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त अमृतसरहून १,९३२ शीख यात्रेकरूंच्या गटासोबत ती अटारी सीमेवरून पाकिस्तानला गेली होती. हा गट दहा दिवस पाकिस्तानमध्ये राहून शीख धर्माशी संबंधित विविध पवित्र स्थळांना भेट देऊन १३ नोव्हेंबर रोजी भारतात परतला. मात्र, सरबजीत कौर या गटासोबत परतली नाही, त्यामुळे भारतातील सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर काही दिवसांतच उर्दूमध्ये लिहिलेला सरबजीतचा निकाहनामा सोशल मीडियावर व्हायरल झाला. या निकाहनाम्यानुसार, सरबजीतने इस्लाम धर्म स्वीकारत आपले नाव बदलून ‘नूर हुसेन’ ठेवले आणि शेखुपुरा येथील नासिर हुसेन नावाच्या मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी तिचा एक व्हिडिओही समोर आला, ज्यामध्ये ती एका धर्मगुरूसमोर आपण स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारत असल्याचे सांगताना दिसत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून नासिरशी ओळख असल्याचे आणि त्याच्यावर प्रेम असल्याचे तिने या व्हिडिओत म्हटले होते.
 
 
हे प्रकरण लवकरच लाहोर उच्च न्यायालयात पोहोचले. पाकिस्तानमधील शीख समुदायाचे माजी आमदार महिंदर पाल सिंग यांनी सरबजीत कौरला ताब्यात घेऊन भारतात पाठवावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेत सरबजीतचा व्हिसा संपलेला असून तिची उपस्थिती राष्ट्रीय सुरक्षेस धोका ठरू शकते, असा दावा करण्यात आला होता. दुसरीकडे, सरबजीत कौर आणि नासिर हुसेन यांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पाकिस्तानी पोलीस आणि अधिकाऱ्यांकडून आपला छळ होत असल्याचा आरोप केला होता. नोव्हेंबर महिन्यात लाहोर उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशात, सरबजीतने लग्न आणि धर्मांतर स्वतःच्या इच्छेने केले असल्यास अधिकाऱ्यांनी तिला त्रास देऊ नये, तसेच तिच्यावर लग्न मोडण्यासाठी दबाव टाकू नये, असे स्पष्ट केले होते. मात्र, सरबजीतला अटक करून भारतात पाठवण्याच्या मागणीवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नव्हता. दरम्यान, सरबजीत कौरच्या पार्श्वभूमीबाबतही माहिती समोर आली आहे. तिचा पहिला पती इंग्लंडमध्ये राहतो आणि काही वर्षांपूर्वी तिने त्याला घटस्फोट दिला आहे. तिला दोन मुले असून, पंजाबमध्ये तिच्यावर आणि तिच्या मुलांवर अनेक गुन्हेगारी खटले दाखल असल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी प्रशासनाने अखेर सरबजीत कौरला भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.