जर ऐकले नाही तर मादुरोसारखे हाल होणार!

ट्रम्प यांचा डेल्सी रॉड्रिग्ज यांना इशारा

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump's warning to Delcy Rodriguez व्हेनेझुएलातील राजकीय संकटामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चा केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी व्हेनेझुएलाच्या नवीन अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, जर त्यांनी अमेरिकेच्या अपेक्षांनुसार कार्य केले नाही तर त्यांना मादुरोपेक्षा मोठा दंड भोगावा लागू शकतो. ट्रम्प यांनी या धमकीचा उल्लेख द अटलांटिक मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केला. २०१८ पासून व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज यांना देशाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यानंतर अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस न्यू यॉर्कमधील तुरुंगात आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला आणखी एक अल्टिमेटम दिला आहे.
 
 
 
Trump
मुलाखतीदरम्यान ट्रम्प म्हणाले, जर तिने योग्य ते केले नाही, तर तिला मोठी किंमत मोजावी लागेल. कदाचित मादुरोपेक्षाही मोठी.” ट्रम्प यांनी डेल्सीचे कौतुक करत त्यांच्या अंतरिम अध्यक्ष पदाची स्वीकृती दर्शविली, तरीही त्यांनी स्पष्ट केले की मादुरो व्हेनेझुएलाचे प्रत्यक्ष अध्यक्ष राहतील आणि देश आपले नैसर्गिक संसाधने संरक्षण करेल. ट्रम्प यांनी डेल्सी यांना इशारा दिला की जर त्यांनी अमेरिकेला सहकार्य केले नाही, तर व्हेनेझुएलावर पुन्हा हल्ला होऊ शकतो. ट्रम्प म्हणाले, आम्ही नुकत्याच शपथ घेतलेल्या लोकांशी व्यवहार करत आहोत. दुसऱ्या हल्ल्यासाठी सर्व तयारी केली आहे, पण ती गरजेची ठरणार नाही. योग्य वेळी व्हेनेझुएलामध्ये निवडणुका आयोजित केल्या जातील.
 
अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या तेल आणि इतर संसाधनांवर पूर्ण नियंत्रण हवे असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, व्हेनेझुएलामध्ये सत्ता बदलल्यानंतर जे काही घडेल ते चांगल्यासाठी असेल; काहीही वाईट होऊ शकत नाही.याशिवाय, ट्रम्प यांनी इतर देशांबाबतही अल्टिमेटम दिला. त्यांनी सांगितले की, आम्हाला ग्रीनलँड देखील हवे आहे. क्युबा देखील नमते घेण्यास तयार आहे. कोलंबिया एका आजारी व्यक्तीच्या हातात आहे, जो जास्त काळ टिकणार नाही. तसेच मेक्सिकोबाबतही काहीतरी करावे लागेल. ट्रम्प यांच्या या वक्तव्यांमुळे व्हेनेझुएलातील राजकीय स्थैर्यावर तसेच अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.