लखनऊ,
Warning from the Prayagraj Police Commissioner उत्तर प्रदेशातील संगम नगरी प्रयागराज येथे माघ मेळा २०२६ उत्साहात सुरू झाला असून लाखो भाविक गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पवित्र स्नानासाठी दाखल होत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसह सुव्यवस्थित वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाने कडक आणि व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. या पार्श्वभूमीवर प्रयागराजचे पोलीस आयुक्त जोगेंद्र कुमार यांनी मेळ्यात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर इशारा दिला आहे.

पौष पौर्णिमेचे स्नान सुरळीत आणि सुरक्षितरीत्या पार पडल्यानंतर, आगामी स्नान पर्वही त्याच शिस्तीत पार पडावीत यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस आयुक्त जोगेंद्र कुमार आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय पाल शर्मा यांनी माघ मेळा परिसराची सखोल पाहणी करत वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेळ्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि वाहतूक कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून वाहतूक नियमनाबाबत सविस्तर सूचना दिल्या. भाविकांची गैरसोय होऊ नये, हा प्रशासनाचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना भाविकांशी सौजन्याने वागण्याच्या आणि आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, कोणत्याही भागात वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास त्या क्षेत्रातील संबंधित निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
माघ मेळ्यात अद्याप चार प्रमुख स्नान पर्व बाकी असून, विशेषतः मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. रस्ते आणि स्नान घाटांवर पोलिसांकडून सतत नजर ठेवली जात असून पोलीस आयुक्त जोगेंद्र कुमार आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय पाल शर्मा स्वतः संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी निश्चित पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, त्यानंतर भाविकांना रॅपिडो आणि इतर सोयींच्या माध्यमातून स्नान घाटांपर्यंत नेले जात आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी तब्बल ३१ लाख भाविकांनी गंगेत स्नान केले, तरीही शहरात कुठेही वाहतूक कोंडी किंवा मोठी अडचण निर्माण झाली नाही. ही यशस्वी व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या समन्वयामुळे शक्य झाल्याचे मानले जात आहे. आगामी स्नान पर्वांदरम्यानही हीच शिस्त आणि कार्यक्षमता कायम राहावी यासाठी वरिष्ठ अधिकारी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत असून आवश्यक त्या सूचना देत आहेत.