समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बस जळून खाक..

सुदैवाने जीवितहानी टळली.. मेहेकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ घडली घटना.

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
मेहेकर,
bus fire समृद्धी महामार्गावर नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खाजगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच बसने पेट घेतला,मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस तात्काळ थांबवण्यात आली,आणि आरडाओरड करून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
 

samrudhi accident 
 
 
बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने रस्त्याच्या कडेला बस उभी केली,आणी त्यानंतर काही मिनिटांतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडुन संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले असले तरी काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ही खाजगी बस नागपूरहून मुंबईकडे जात असतांना मेहेकर तालुक्यातील शिवणी पिसा गावाजवळ हि घटना घडली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक नियंत्रित करून पर्यायी मार्गाने वाहने वळवली. महत्त्वाची बाब म्हणजे, काही महिन्यांपूर्वी याच समृद्धी महामार्गावर खाजगी बसला आग लागून 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही महामार्गावरील सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप आता पुन्हा पुढे येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.bus fire वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहनांची तांत्रिक तपासणीचा अभाव आणि आपत्कालीन यंत्रणेची अपुरी उपलब्धता यामुळेच असे अपघात घडत असल्याचे मत नागरिक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील प्रवासी वाहतूक सुरक्षित करण्यासाठी शासनाने आणि संबंधित विभागांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.