बांगलादेशची मान मोदींच्या हातात

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
वेध
 
चंद्रकांत लोहाणा
bangladesh बांगलादेशच्या जन्मापासून कधी नव्हे एवढे संबंध भारताशी ताणले गेले आहेत. त्यास कारणीभूतही स्वत: बांगलादेश असून, त्याने स्वत:च पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. भारताशिवाय पर्याय नसतानाही बांगलादेशच्या सध्याच्या नेतृत्वाने हा आत्मघाती पर्याय निवडला आहे. मागील एका महिन्यामध्ये तीन हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. तेथील हिंदूंचा अतोनात छळ अजूनही सुरू आहे. बांगलादेशात नवीन उदयास आलेले पक्ष भारतविरोधी गरळ ओकत आहे. भारताची सात पूर्वोत्तर राज्ये आम्ही तोडून भारताचे तुकडे पाडू. भारताला धडा शिकवू अशा प्रकारच्या घोषणा सध्या बांगलादेशमधील अनेक नेते देत आहेत. तेथील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूसही बाहेर देशामध्ये जाऊन भारतविरोधी गरळ ओकण्यात सध्या आघाडीवर आहेत.
 
 

बंगलादेश  
 
 
त्यामुळे या देशाबद्दल भारतानेही आपल्या धोरणामध्ये बदल करून धडा शिकविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
चीनमध्ये जाऊन युनूस यांनी चीनला पूर्वोत्तरमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. अशा प्रकारे भारताला डिवचण्यासाठी युनूस आणि तेथील नेते सध्या टपून बसले आहेत. असे असले तरी बांगलादेशची मान सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये असून, ती नरेंद्र मोदी यांनी आवळली तर बांगलादेशमध्ये हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही. बांगलादेशात वाहणाऱ्या सर्व नद्या भारतामधून जातात. त्यामधील सर्वाधिक महत्त्वाची नदी म्हणजे गंगा आहे. या गंगा नदीच्या मुख्य प्रवाहाने बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यास पद्माच्या नावाने ओळखले जाते. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 12 डिसेंबर 1996 साली गंगा नदी पाणी करार झाला होता. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. हा करार 30 वर्षांसाठी असल्याने या कराराची मुदत यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये संपत आहे. त्यामुळे बांगलादेशच्या जर मुसक्या आवळायच्या असतील तर भारताने हा संपूर्ण करार रद्द करून बांगलादेशमध्ये जाणारे गंगेचे पाणी स्वतःसाठी राखीव ठेवायला हवे. या करारानुसार भारत दरवर्षी बांगलादेशला जवळपास 35 हजार क्यूसेस पाणी देतो. या पाण्यावरच बांगलादेशची तहान भागविली जाते. या व्यतिरिक्त ब्रह्मपुत्र आणि मेघना या दोन प्रमुख नद्यांचा प्रवाहही भारतातूनच बांगलादेशात जातो. त्यामुळे बांगलादेशने कितीही उड्या मारल्या, कितीही वल्गना केल्या तरी त्यांच्या मुसक्या आवळण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक निर्णय पुरेसा आहे.
1971 पासून भारताने बांगलादेशसोबत सदैव मैत्रीचा हात पुढे करून त्यास मदतच केली आहे. त्या मदतीची परतफेड जर शत्रुत्वाने होत असेल तर भारतानेही गंभीरतेने या बाबीचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा पाणी करार पूर्णपणे रद्द करून भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. त्यामुळे मोहम्मद युनूस यांच्या काळजाचे ढोके वाढायला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी आपणासही पाकिस्तानसारखा दणका देईल की काय या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे त्यांना हा करार करण्याची घाई झाल्याचे दिसून येत आहे. 2014 नंतर इच्छाशक्ती दृढ असलेला नवीन भारत साऱ्या जगाने बघितला आहे.bangladesh केंद्र सरकारचे धोरण बघता हा करार यापुढे होणार नाही, असा विश्वास जनतेला आहे. नरेंद्र मोदी यांच्या कूटनीतीने पाकिस्तानची संपूर्ण जगामध्ये नाचक्की झाली आहे. बांगलादेशची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. या होणाऱ्या उलथापालथीने काँग्रेसच्या युवराजांना बांगलादेशचा उमाळा येऊन ते नरेंद्र मोदी यांना घेरून पुन्हा एकदा बदनाम करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. भारतातील जनतेने काँग्रेसला नाकारल्यामुळे त्यांच्या सर्व आशाआकांक्षा विदेशाकडे लागल्या आहेत. सत्तेसाठी विदेशामध्ये जाऊन खटाटोप करणे हा सध्या त्यांचा एकमेव आवडता कार्यक्रम आहे. परंतु, विचलित न होता राष्ट्र प्रथम या भावनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिशा ठरलेली आहे. जनतेच्या मनामध्ये काय आहे, हे ते पक्के जाणून आहे. त्यामुळे बांगलादेशही वठणवीवर येण्यास फार काळ लागणार नाही, एवढे मात्र नक्की.
 
9881717856