विविध नाटकांतून चिमुकल्यांनी उमटविले जीवनमूल्यांचे सूर

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
नागपूर,
drama competition महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी बालनाट्य सादरीकरणांनी मनोरंजनासोबतच सामाजिक भान, जीवनमूल्ये आणि संवेदनशीलतेचा प्रभावी संदेश दिला. विविध संस्थांतर्फे सादर करण्यात आलेल्या या बालनाट्यांनी बालमनाशी थेट संवाद साधत प्रेक्षकांची मने जिंकली.
 
 
 
बालनाट्य
 
‘तेजाचे यात्रिक’ या रहस्यप्रधान बालनाट्यातून सत्यशोध, करुणा आणि आत्ममुक्तीचा आशय मांडण्यात आला. गरीब मुलगा, त्याची आई आणि अतृप्त आत्म्यांच्या मुक्ततेची कथा निरागसतेच्या माध्यमातून उलगडत भयाऐवजी करुणेचा संदेश देण्यात आला. डॉ. वासंती इनामदार लिखित व मयुरी टोंगळे दिग्दर्शित या नाटकाने कलात्मक उंची गाठली. आजच्या ताणतणावग्रस्त बालजीवनावर प्रकाश टाकणारे ‘राज्य असं हवं’ या नाटकात पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या भावविश्वातील संघर्ष प्रभावीपणे दाखवण्यात आला. आभास व वास्तव यातील फरक समजावून सांगणाऱ्या या नाटकाने पालकांनाही आत्मपरीक्षणास भाग पाडले.
मोबाईल व स्क्रीनच्या व्यसनावर प्रहार करणारे ‘मुक्तांगण’ हे बालनाट्य वास्तवापासून दुरावणाऱ्या बालमनाला जाग करणारे ठरले. आभासी जगाच्या विळख्यात अडकलेल्या मुलांच्या भावविश्वाचे प्रभावी चित्रण या नाटकातून करण्यात आले. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे ‘घायाळ पाखरा’ या नाटकात दारिद्र्य व अपंगत्वावर मात करत शिक्षणासाठी झगडणाऱ्या मुलाची हृदयस्पर्शी कथा मांडण्यात आली.
खेळातील पराभव स्वीकारण्याचा संदेश देणारे ‘अजिंक्य’ आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचे दर्शन घडवणारे ‘पूर्णब्रह्म’ या नाटकांनीही बालप्रेक्षकांवर खोल परिणाम केला. तर धनंजय सरदेशपांडे लिखित व आराध्या चन्ने दिग्दर्शित 'एलियन द ग्रेट' या नाटकाद्वारे मुलांच्या आयुष्यात आजी आजोबांचे महत्व ठामपणे सांगितले.drama competition एकूणच या बालनाट्यांनी केवळ करमणूक न करता जीवनमूल्ये, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक संस्कार रुजवणारा प्रभावी रंगमंच अनुभव दिला.