श्रमिक पत्रकार संघाचा चौथा स्तंभ पुरस्कार प्रदान

* तभाचे लोंढेसह नऊ जण ठरले मानकरी

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
marathi-journalists-day : वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारदिनी दिल्या जाणार्‍या चौथा स्तंभ पुरस्कारासह विविध क्षेत्रात काम करणार्‍या नऊ जणांना आज मंगळवार ६ रोजी स्थानिक धुनिवाले देवस्थान सभागृहात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 
 
lk
 
अध्यक्षस्थानी माजी खासदार रामदास तडस होते तर प्रमुख वते म्हणून ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया, प्रमुख पाहुणे म्हणून आ. राजेश बकाने, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील बुरांडे उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, डॉ. राजेंद्र मुंढे, गजानन गावंडे, रमेश निमजे, इक्राम हुसेन आदी उपस्थित होते.
 
 
यावेळी स्व. वामनराव दिवे ट्रस्टचा सिंचन व शेती क्षेत्र पुरस्कार सुरेश पाटील (हळदगाव), ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे स्मृती पत्रकारिता पुरस्कार मनोज भोयर (मुंबई), बबीबाई नंदकिशोर जावंधिया स्मृती पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी नवले (साहूर) या विद्यार्थिनीला, पत्रकार प्रा. डॉ. प्रवीण वानखेडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश भट्टड (आर्वी) आणि प्रवीण होणाडे यांना, प्रशांत हेलोंडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार तरुण भारतचे हिंगणघाट शहर प्रतिनिधी रमेश लोंढे, मनोज मुते स्मृती पत्रकारिता पुरस्कार पत्रकार पराग ढोबळे (नागपूर), आदर्श पालक सन्मान पुरस्कार डॉ. राजेंद्र व डॉ. मिना डागा या दाम्पत्याला तर ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता सन्मान पुरस्कार मनोहर मुडके यांना प्रदान करण्यात आला.
 
 
प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण घोपटे यांनी संचालन सहसचिव प्रफुल्ल व्यास यांनी केले तर उपाध्यक्ष गजानन गावंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला वर्धा नागरी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल जोशी, प्रसिद्ध कवी व साहित्यिक संजय इंगळे तिगावकर, मुरलीधर बेलखोडे, हरीश इथापे, गजेंद्र सुरकार, माजी नगरसेवक श्रेया देशमुख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इद्रीस मेमन, आदींसह जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिती होती.
 
 
यावेळी जावंधिया म्हणाले, सरकारी कर्मचार्‍यांना चालू वर्षात आठवा वेतन लागू होणार आहे. सरकारचे धोरण शासकीय कर्मचार्‍यांसाठी असेल मग शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांसाठी का नाही? पक्ष कोणताही असो फत निवडणूक जिंकण्यापुरते राजकारण करतो आहे. आज देशातील शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांना सन्मानाने जगता यावे, यासाठी प्रयत्न नको का? आठव्या वेतन आयोगानुसार चपराशाला ४५ हजार रुपये मग आमच्या शेतकर्‍याला किमान ८०० रुपये रोज नको का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनीही पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 
 
तर पत्रकार भवनाला निधी देऊ : आ. बकाने
 
 
पत्रकारांच्या कार्यक्रमाला येणं आपली जबाबदारी नसून कर्तव्य आहे. समाजाचं खरं वास्तव मांडत असताना पत्रकारांना अनेक समस्यांशी तोंड द्यावं लागतं. येथील पत्रकार भवनाचा विषय रेंगाळत आहे. आपला मतदार संघ वर्धेलगत आहे. पत्रकार भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिल्यास आमदार निधीतून ५० लाख रुपये पत्रकार भवनाला देऊ, अशी ग्वाही आ. राजेश बकाने यांनी यावेळी दिली.
 
 
पत्रकारांची जबाबदारी वाढली : तडस
 
 
नेता किंवा पदाधिकारी सकाळी एखाद्या पक्षाला वाईट म्हणतो शिव्या देतो आणि दुपारीच तो त्याच पक्षात प्रवेश घेतो. त्यामुळे आता हे नेते कोणत्या पक्षाचे हेच कळायला मार्ग नाही अशा वेळी हे नेते कोणत्या पक्षाचे हे शोधण्याचे एक काम पत्रकारांचे वाढले असल्याची खुसखुशीत टीका तडस यांनी केली.