माया धोटे यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदान

जळगाव येथे सन्मान, कृषी क्षेत्रातील योगदानाची दखल

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
कारंजा लाड, 
maya-dhote : कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, शेतकरी हितासाठी केलेली सातत्यपूर्ण धडपड आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत कारंजा येथील माया धोटे यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय कृषक समाज यांच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृह, जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.
 
 
 
k
 
 
 
महाराष्ट्राचे पहिले कृषिमंत्री, शेतकरी चळवळीचे प्रणेते आणि कृषी शिक्षणाचे जनक असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, यंदाच्या वर्षी हा मानाचा पुरस्कार कारंजा येथील माया धोटे यांना मिळाल्याने परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. कार्यक्रमास कृषी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन माया धोटे यांचा गौरव करण्यात आला. माया धोटे यांनी शेतकरी महिलांचे संघटन, कृषी विषयक जनजागृती, शेतकर्‍यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, नैसर्गिक शेती, बचतगट चळवळ तसेच ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक शेतकरी व शेतकरी कुटुंबांना दिशा मिळाली असून, त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामीण भागात दिसून येत आहे.
 
 
पुरस्कार स्वीकारताना माया धोटे यांनी हा सन्मान संपूर्ण शेतकरी वर्गाला अर्पण करताना शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर काम करत राहण्याची प्रेरणा मला या पुरस्कारामुळे मिळाली आहे. असे मत व्यक्त केले. तर यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांना पुढे नेणार्‍या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. माया धोटे यांचे कार्य हे त्याच विचारधारेचे प्रतिबिंब असल्याचे नमूद केले. या पुरस्कारामुळे कारंजा तालुयासह वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध स्तरातून माया धोटे यांचे अभिनंदन होत आहे.