नागपूर,
multilingual-childrens-theatre-festival : बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेद्वारे श्री साई सभागृह, शंकरनगर येथे आयोजित बहुभाषिक बालनाट्य महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध भारतीय भाषांतील बालनाट्यांच्या सादरीकरणातून सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन या महोत्सवात घडले. या प्रसंगी सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी श्रीनिवासन, पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते विजय लिमये, बालरंगभूमी परिषद अध्यक्षा आभा मेघे, कार्याध्यक्ष संजय रहाटे, श्रद्धा तेलंग तसेच संयोजक विलास कुबडे, प्रशांत मांगदे, अनिल देव आणि किशोर डाऊ उपस्थित होते.
महोत्सवात विविध शाळा व संस्थांकडून आठ भाषांतील बालनाट्ये सादर झाली. साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीतर्फे तामिळ भाषेतील ‘सरस्वती सब्यम’, सरस्वती विद्यालयतर्फे हिंदीतील ‘सच्ची देशभक्ति क्या है?’, एसआयईएस ऑफ लँग्वेज, व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे तेलुगूतील ‘नृसिंह स्वामी’, जे. एन. टाटा पारसी ट्रस्टतर्फे हिंदीतील ‘नदी के पार’ आणि जे. एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कूलतर्फे इंग्रजीतील ‘हार्मोनी हाइट्स हायस्कूल एज्युकेशन इलेक्शन’ ही नाटके सादर झाली.
तसेच सिंधुडी यूथ विंगतर्फे सिंधीतील ‘देर आयद दुरुस्त आयद’, अंजुमन हायस्कूलतर्फे उर्दूतील ‘पडोसी के हुकूक’ आणि बुद्धिस्ट अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे पाली भाषेतील ‘सो एको राजहंसो’ या बालनाट्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. समारोपप्रसंगी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे विभागीय केंद्र नागपूरच्या सचिव सुनीता मुंजे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सर्व सहभागी संस्थांना स्मृतिचिन्हे, तर कलाकारांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. बहुभाषिकतेतून बालमनावर संस्कार करणारा हा महोत्सव नागपूरच्या सांस्कृतिक रंगभूमीत विशेष ठरला.