नासाचे मेगा-मिशन: माइक फिन्के इतिहास घडवणार...स्पेसवॉकची तयारी पूर्ण

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
NASA's mega-mission नासाने नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) दोन महत्त्वाच्या स्पेसवॉकसाठी तयारी पूर्ण केली आहे. या मोहिमांचा मुख्य उद्देश स्टेशनची ऊर्जा प्रणाली अपग्रेड करणे आणि दीर्घकालीन सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करणे आहे. आत्तापर्यंत, ISS च्या बांधकाम, देखभाल आणि अपग्रेडसाठी २७७ स्पेसवॉक पूर्ण झाले आहेत, परंतु मोकळ्या अंतरात केलेले हे स्पेसवॉक अत्यंत धोकादायक मानले जातात.
 
 
 
NASA
स्पेसवॉक दरम्यान अंतराळवीरांना अत्यंत तापमान चढउतारात सुमारे १३० किलो वजनाचे स्पेससूट परिधान करून काम करावे लागते. हातमोजे घालून साधने धरून बोल्ट काढणे खूप कठीण असते, तसेच ६ ते ७ तास चालणाऱ्या या मोहिमेत प्रत्येक क्षणी तीव्र एकाग्रता आवश्यक असते. पहिला स्पेसवॉक ८ जानेवारी रोजी होणार आहे. यात अंतराळवीर माइक फिन्के आणि जेना कार्डमन स्टेशनच्या मुख्य सौरऊर्जेच्या अपग्रेडसाठी बाहेर पडतील. हा जेना कार्डमनचा पहिला स्पेसवॉक असेल, तर अनुभवी माइक फिन्के आपला दहावा स्पेसवॉक पार पाडतील, ज्यामुळे त्यांनी नासाच्या इतिहासात सर्वाधिक स्पेसवॉक करणारा विक्रम प्रस्थापित करणार आहेत.
 
दुसरा स्पेसवॉक १५ जानेवारी रोजी होण्याची अपेक्षा आहे. या मोहिमेत एचडी कॅमेरा बदलणे, हार्मनी मॉड्यूलवर प्लॅनर रिफ्लेक्टर बसवणे आणि स्टेशनच्या ट्रस सेक्शनमध्ये हार्डवेअर हलवणे यासारखी कामे केली जाणार आहेत. या स्पेसवॉकमध्ये सहभागी होणाऱ्या अंतराळवीरांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. नासाच्या या मेगा-मिशनमुळे ISS ची कार्यक्षमता सुधारली जाणार असून, अंतराळ संशोधनाच्या इतिहासात ही मोहिम महत्वाची मानली जात आहे.