नागपूर,
abha meghe नाटक ही अनेक भावनांचा सूक्ष्मपणे विचार करणारी प्रभावी कला असून बालवयात नाट्यकलेत सहभाग घेतल्यास मुलांच्या भावना, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषद, नागपूरच्या अध्यक्ष आभा मेघे यांनी केले. वसंतराव नाईक स्मृती सभागृह, वनामती येथे आयोजित २२ व्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी आयोजित या भव्य उद्घाटन सोहळ्यास प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर उद्घाटक म्हणून उपस्थित होते. याशिवाय नाट्य परिषद महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख, मागील वर्षीच्या बालनाट्य स्पर्धेतील रौप्यपदक विजेते व्यंकटेश माकडे व कौमुदी साल्पेकर, राज्य सांस्कृतिक संचालनालयाचे संदीप शेंडे व वसंत खडसे हे मान्यवर उपस्थित होते. आभा मेघे यांनी पुढे बोलताना गेली २२ वर्षे सातत्याने सुरू असलेली ही बालनाट्य स्पर्धा ही एक महत्त्वाची सांस्कृतिक चळवळ असून याच व्यासपीठावरून भविष्यातील यशस्वी कलाकार घडतील, असा विश्वास व्यक्त केला.
सलीम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लहानपणापासून रंगभूमीशी नाते असल्याने जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाल्याचे सांगितले.abha meghe माणसे आणि भावना समजून घेण्याची क्षमता नाटकामुळेच निर्माण झाली, असे त्यांनी नमूद केले. स्पर्धेतील सर्व परीक्षकांनी सहभागी बालकलावंतांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.