चंद्रपूर,
kidney-selling-racket-case : महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या किडनी विक्री रॅकेट प्रकरणातील लखनऊचा आणखी एक पीडित तारिक अहमद यांचीही किडनी तामिळनाडूच्या त्रिची रुग्णालयातच काढल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरूवातीला तारीकला कंबोडियात नेण्यात आले होते. मात्र, त्यांचा रक्तगट 'ओ निगेटिव्ह' असल्याने तेथे रक्त सहज उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर त्यांना भारतात आणून त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पीटलमध्ये त्यांची किडनी काढली गेली. या रुग्णालयाचे संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी आणि दिल्लीतील डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या विरोधात आता 'एसआयटी'कडे भक्कम पुरावे गोळा झाले आहेत.
मिंथूर येथील पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या रॅकेटचा मुख्य दलाल 'डॉ. कृष्णा' उर्फ रामकृष्ण सुंचू याच्या माध्यमातून देशभरात हे रॅकेट चालविले जात असल्याचे समोर आले. कंबोडियात किडनी काढण्यासाठी रोशन कुळे यांच्यासोबत आणखी पाच जण गेले होते. त्यामध्ये गोपाल व लखनऊ येथील तारिक अहमद हेही होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. कंबोडियात गेल्यानंतर या पाच जणांपैकी चार जणांची किडनी काढण्यात आली.
मात्र, तारिकचा रक्तगट 'ओ' निगेटीव्ह असल्याने तेथील डॉक्टरांनी रक्ताच्या चार बाटल्या जमा करण्याची सूचना केली. परंतु, ऐनवेळी या दुर्मिळ रक्तगटाचे दाते मिळाले नसल्याने तारिकला परत भारतात आणावे लागले. कंबोडियातून भारतात आल्यानंतर रामकृष्ण सुंचूने महिनाभरात पुन्हा तारिकशी संपर्क साधंला आणि भारतातच शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगून त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पीटलमध्ये नेले. त्या ठिकाणी तारिकची किडनी काढून त्याला केवळ ५ लाख रुपये देण्यात आल्याची माहिती आहे. आतापर्यंत त्रिची येथील हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया करून किडनी काढलेले दोन पीडित पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांचे बयाणही नोंदविण्यात आले आहे. तर बंगळुरू येथील तिसरा पीडित पोलिसांना गवसला नसल्याने त्याला नोटीस देवून हजर राहण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी आणि डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या अडचणी वाढत आहेत.
तारिकही कर्जबाजारी होता!
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील तारिक अहमद (३६) यांचा ट्रॅव्हल्स एजन्सीचा, तर त्यांच्या वडिलांचा 'हॉर्डवेअर'चा व्यवसाय होता. मात्र, कोरोना काळात दोघांचे व्यवसाय डबघाईस आल्याने त्यांच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा ठाकला होता. समाजमाध्यमावरून आरोपी रामकृष्ण सुंचू याच्याशी संपर्क झाल्यानंतर किडनी विकण्याचा तारिकने निर्णय घेतला होता. रोशन कुळे सुद्धा याच परिस्थितीत या रॅकेटमध्ये अडकला होता, हे विशेष.
डॉ. रवींद्रपाल सिंग प्रकरणी आज निकाल
डॉ. रवींद्रपाल सिंग चंद्रपूरच्या न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याला तात्पुरता जामीन देण्यात आला होता. मात्र, मंगळवारी त्यावर अंतिम निर्णय येणार होते. म पोलिस व आरोपीच्या वकिलांकडून युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला असून, बुधवारी त्यावर निकाल अपेक्षित आहे.