पुणे,
Suresh Kalmadi has passed away ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते आणि काही काळापासून उपचार घेत होते. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी दिली असून या वृत्ताने राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजेपर्यंत पुण्यातील एरंडवणे येथील कलमाडी हाऊस येथे नागरिकांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पुण्याचे माजी खासदार असलेले सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रीय राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. केंद्र सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याचबरोबर भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवताना त्यांनी देशातील क्रीडा क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळवून दिले. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवेतून सार्वजनिक जीवनात प्रवेश केलेल्या कलमाडी यांनी राजकारणात दीर्घ काळ प्रभावी भूमिका बजावली.
राजकीय वर्तुळात त्यांना ‘पुण्याचे किंगमेकर’ म्हणून ओळखले जात होते. पुण्याच्या पायाभूत सुविधा, विकासकामे आणि शहराच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिमेसाठी त्यांनी दिलेले योगदान आजही चर्चेत आहे. क्रीडाविश्वातील त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली जाते. २०१० साली झालेल्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या स्पर्धांभोवती निर्माण झालेल्या वादांमुळे त्यांच्या राजकीय प्रवासावर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी भारतीय क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, हेही तितकेच वास्तव आहे.
सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराने तसेच महाराष्ट्राने एक प्रभावी आणि वादग्रस्त पण तितकाच महत्त्वाचा नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अवघड असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.