नवी दिल्ली,
Vaibhav Suryavanshi won the series वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली भारतीय १९ वर्षांखालील संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध युवा एकदिवसीय मालिका जिंकली आहे. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ-लुईस पद्धतीने आठ विकेट्सने विजय मिळवत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली. नियमित कर्णधार आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणाऱ्या वैभवने आपल्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित केले. विलोमूर पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात हवामानाने अनेक वेळा अडथळे निर्माण केले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २४५ धावांवर माघारी परतला.
जेसन रॉल्सने ११४ धावांची शानदार खेळी केली, मात्र इतर फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाहीत. भारताकडून किशन कुमारने नवीन चेंडूने गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या, तर आरएस अम्ब्रीशने दोन बळी टिपले. दीपेश देवेंद्रन, कनिष्क चौहान आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने संघाला आक्रमक सुरुवात दिली. फक्त २४ चेंडूत ६८ धावा करून त्याने संघाचा विजयाचा पाया घातला. त्यानंतर वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंडू यांनी संघाची जबाबदारी उचलली आणि कोणत्याही दबावाशिवाय टीमला विजयाकडे नेले.
पावसामुळे डीएलएस नियमानुसार भारतासमोर २७ षटकांत १७४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले, जे भारताने २३.३ षटकांत १७६ धावा करून पटकावले. वेदांत त्रिवेदी (३१*) आणि अभिज्ञान कुंडू (४८*) नाबाद राहिले आणि संघाला विजय मिळवून दिला. भारताने मालिका आधीच जिंकली असून, ७ जानेवारी रोजी होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जिंकून क्लीन स्वीप करण्याचा संघाचा प्रयत्न असेल. वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखालील आणि स्फोटक फलंदाजीमुळे भारतीय अंडर-१९ संघ भविष्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.