वर्धा,
actor-govind : एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला चित्रपट अभिनेत्याची उपस्थिती म्हणजे शिट्ट्या, टाळ्या, कंबर लचकवत नाच आलाच. परंतु, सोमवारी रात्री वर्धेच्या केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा महामृत्यूंजय मंत्र उच्चारू लागला... काल, दु:ख, रोग, दारिद्रय हर म्हणत म्हणत तो हरहर महादेव म्हणाला आणि वर्धेकरांनी जय श्रीरामने त्याला उत्तर दिले...याच वेळी गोविंदाने आई वडिलांची सेवा करण्याचाही मंत्र दिला.

वर्धेचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या अनेक वर्षांपासुन ‘आमदारश्री शरीर सौष्टव’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे केंद्रबिंदू होता तो प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा! या स्पर्धेत बॉडी बिल्डर्स सहभागी झाले होते. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात गोविंदा डायसवर आला. हाताता माईक घेतला आता कोण्या एका चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरल्या जाईल आणि शिट्ट्या वाजतील असे चित्र असतानाच गोविंदाने ‘ॐ त्र्यंबकम् यजामहे सुगंधीम पुष्टि वर्धनम् उर्वारूकमिव बंधना मृत्यूर्मुष्क्षीय यमाममृतात्’ या महामृंत्यूजय मंत्राने सुरुवात केली. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. राजेश बकाने, आ.समिर मेघे, माजी खासदार रामदास तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते आदींची उपस्थिती होती.
सोबतच काल हर, दु:ख हर, कष्ट हर, दारिद्रय हर, रोग हर असे आर्जव करीत हर हर महादेवचा जय घोष केला. त्याला वर्धेकर प्रेक्षकांनी जय श्रीरामने प्रतिसाद दिला. सोबतच आपण आईच्या आशीर्वादाने हिरोचा हिरो नंबर वन झाल्याचे सांगितले. तुम्ही बॉडी कमवा, मोठे व्हा, नाव मिळावा, इज्जत मिळावा. पण, आई वडिलांची त्यांची सेवा करा, आशीर्वाद घ्या. ईश्वराने जे तुमच्या नशिबात लिहिले ते मिळेलच. पण, तुम्ही जो विचारही केला नाही ते आई वडिलांच्या आशीर्वादाने मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला.