गडचिरोली,
vidarbha provincial convention अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) विदर्भ प्रांताचे 54 वे प्रांत अधिवेशन येत्या 9, 10 व 11 जानेवारी रोजी गडचिरोली येथील भगवान बिरसा मुंडा नगर, सुमानंद सभागृह (आरमारी रोड) येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी 9 जानेवारी रोजी सकाळी 11.45 वाजता होणार आहे.
उद्घाटनाप्रसंगी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आयपीएस संदीप पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. विरेंद्रसिंह सोलंकी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गडचिरोलीत प्रथमच विदर्भ प्रांत अधिवेशन होत असून, विदर्भातील 350 महाविद्यालयांतील सुमारे 500 विद्यार्थी प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अधिवेशन परिसराला ‘भगवान बिरसा मुंडा नगर’ तर मुख्य सभागृहाला ‘वीर बाबुराव शेडमाके सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे. अधिवेशनात प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्र्यांचे निर्वाचन, शैक्षणिक व सामाजिक विषयांवरील चर्चा तसेच विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिवेशन दरम्यान 10 जानेवारी शनिवारी दुपारी 3.30 वाजता गडचिरोली शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा भगवान बिरसा मुंडा नगर सुमानंद सभागृह येथून इंदिरा गांधी चौक मार्गे, धानोरा मार्गावरून बाबुराव मडावी चौक ते रेड्डी गोडाऊन चौक-चामोर्शी मार्गावरील बस स्टँड या मार्गाने जाणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता अभिनव लॉन येथे जाहीर सभेत या यात्रेचा समारोप होणार आहे.vidarbha provincial convention अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री विरेंद्र सोलंकी व राष्ट्रीय मंत्री पायल किनाके आणि छात्र नेते या सभेला संबोधित करणार आहेत. होणार्या शोभायात्रेसाठी गडचिरोलीतील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अभाविपने केले. अधिवेशनात ‘झिरो फूड वेस्ट’ व कमी प्लास्टिक वापराची संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती अभाविपच्या वतीने देण्यात आली.