नागपूर,
cricket-metro-nagpur : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवार, २१ जानेवारी रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियम येथे होणार्या टी-२० क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो ट्रेन सेवा रात्री १० नंतर सुध्दा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी नागरिकांच्या मोठी सोय होणार आहे. क्रिकेट सामना बघितल्यानंतर रात्री १२ पर्यंत नागरिकांना मेट्रो सेवेचा लाभ घेता येणार आहे. या संदर्भात मेट्रो भवन येथे महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक अनिल कोकाटे व विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय बडकस तसेच पदाधिकार्यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत सामन्याच्या दिवशी प्रवाशांचा सुरक्षित, सुलभ व जलद प्रवास सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी खापरी मेट्रो स्टेशन ते जामठा स्टेडियम या मार्गावर नागपूर महानगरपालिकेच्या बसेस फिडर सेवा म्हणून उपलब्ध असतील.यामुळे रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

क्रिकेट सामन्याच्या दिवशी शेवटची ट्रेन खापरी मेट्रो स्टेशनवरून मध्य रात्री १२ वाजता सुटेल. पण त्या पूर्वी क्रिकेट प्रेमींच्या आवश्यकतेनुसार ही सेवा सुरु राहील. खापरी येथून प्रवासी ऑटोमोटिव्ह स्क्वेअरपर्यंत थेट प्रवास करू शकतील. सीताबर्डी इंटरचेंजवर ट्रेन बदलून अॅ.क्वा लाईनवरील कोणत्याही दिशेने प्रवास करू शकतील. गाड्या दर १० मिनिटांच्या अंतराने धावणार आहेत.
व्हीसीए जामठा स्टेडियम हे न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून ७ किमी व खापरी मेट्रो स्टेशनपासून ६ किमी अंतरावर आहे. स्टेडियमकडे जाण्यासाठी तसेच सामन्यानंतर परतीसाठी न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून मनपाच्या बसेस (शुल्क आकारून) उपलब्ध असतील. मॅचनंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित व जलद नागरिकांनी महा मेट्रो सेवेचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोतर्फे करण्यात आले आहे.