“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट!”

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
अमरावती,
amravati municipal election शिवसेना सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी जन्माला आली आहे, असे ठणकावून सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सत्तालालसेवर घणाघाती प्रहार केला. मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा असल्याचा स्पष्ट संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणात आक्रमकपणे उतरायचे आदेश दिले.
 

eknath shinde speech, amravati municipal election 
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अमरावतीत थेट रणशिंग फुंकले. नेहरू मैदानावर झालेल्या जाहीर प्रचारसभेत त्यांनी विकास, महिला सशक्तीकरण, मूलभूत सुविधांचा अभाव आणि विरोधकांच्या अपयशावर जोरदार हल्लाबोल करत, “जे बोलतो ते करतो, कमी बोलतो पण जास्त काम करतो,” असा ठाम विश्वास मतदारांना दिला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील नेहरू मैदानावर शिवसेनेची जाहीर प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला लाडक्या बहिणीचा लाडक्या भावांची विशेष गर्दी होती. संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या विकासासाठी ठोस रोडमॅप मांडत, येत्या १५ तारखेला धनुष्यबाणासमोरील बटण दाबण्याचे आवाहन केले.
“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा तुमच्या भावाचा शब्द आहे,” असे ठाम सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली. कोर्टात अडथळे आणले गेले तरी महिलांच्या ताकदीमुळेच महायुतीला प्रचंड यश मिळाले, असे त्यांनी नमूद केले.
“महिलांचा पाठिंबा म्हणजे विजयाची खात्री,” असे सांगत नगरपरिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतील अनुभव त्यांनी मांडला.उपमुख्यमंत्र्यांनी अमरावतीतील पाणीटंचाई, खराब रस्ते, कचरा व्यवस्थापन, लटकलेल्या वीजतारा, स्ट्रीट लाईट, गटार व्यवस्था, उद्याने, मैदान, स्टेडियम, रुग्णालये अशा मूलभूत प्रश्नांवर थेट भाष्य केले.नगरविकास विभागाचे मंत्री म्हणून कचरा प्रकल्पाचा मार्ग काढणारच, अंडरग्राउंड वीजजाळे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि भक्कम रस्ते देण्याचा शब्द त्यांनी दिला.अमरावती महापालिकेसाठी गार्डन विकासाकरिता १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती देत, भविष्यात आणखी तरतूद केली जाईल, असे त्यांनी सांगितले. रस्ते व पाणीपुरवठा योजनांसाठी नगरविकास विभागामार्फत निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
भाषणाच्या शेवटी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,“अमरावतीचा कायापालट करायचा असेल, विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. १५ तारखेला मतदान नाही, तर अमरावतीच्या भविष्याचा फैसला होणार आहे.”सभेला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता, जलसंधारण मंत्री संजय राठोड, ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार संजय रायमुलकर, प्रियांका विश्वकर्मा, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.