अकोला,
Hidayat Patel has passed away अकोल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. काल अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक चाकूहल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हिदायत पटेल मोहाळा गावातील मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत असताना उबेद पटेल या तरुणाने अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर गंभीर वार करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने अकोटमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. अखेर उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
आरोपीस अटक:आकोट ग्रामीण मध्ये गुन्हा दाखल
पटेल यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची चार पथक आरोपीच्या शोधात गठित करण्यात आली.दरम्यान पणज येथून रात्री आरोपी उबेद खान कालु खान याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या हल्ल्यामागे राजकीय आणि कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी उबेद पटेल फरार झाला होता. मात्र रात्री उशिरा पणज गावातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. उबेद पटेल हा 2019 मध्ये घडलेल्या एका खुनाच्या घटनेतील मृत मतीन पटेल यांचा पुतण्या आहे. लोकसभेच्या 2019 च्या निकालानंतर मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती. त्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल होता, हेही विशेष.
हिदायत पटेल हे अकोल्यातील काँग्रेसचे एक प्रभावी आणि ओळखीचे नाव होते. ते जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा मानले जात होते. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी लढवली होती. 2014 मध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर तर 2019 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. सहकार क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा होता. गेल्या 25 वर्षांपासून ते जिल्हा बँकेचे संचालक होते. सध्या ते अकोट तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या अकोट बाजार समितीचे ते माजी सभापती असून सध्या संचालकपद भूषवत होते. हिदायत पटेल यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने समर्थक, काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.