पत्रकारांनी लेखणीच्या बळावर लोकशाही अधिक बळकट करावी

अजित नाथानी यांना ‘गडचिरोली गौरव पुरस्कार’ प्रदान

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
गडचिरोली,
democracy लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेला आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पत्रकारांनी मोलाचे योगदान दिले असून आजही समाज आणि देशाच्या विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या बळावर लोकशाही अधिक मजबूत करावी, असे आवाहन काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने मंगळवारी (ता. 6) स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिन व ‘गडचिरोली गौरव पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते.
 
 

गडचिरोली  
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आमदार वडेट्टीवार म्हणाले की, पत्रकार आणि लोकप्रतिनिधींना कार्य करताना अनेकदा विरोधाचा व रोषाचा सामना करावा लागतो. बदलत्या काळात पत्रकारीतेचे स्वरूप बदलत असून पत्रकारांच्या विविध समस्यांकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे अजित नाथानी यांची ‘गडचिरोली गौरव पुरस्कार’ासाठी निवड करून गडचिरोली प्रेस क्लबने योग्य व्यक्तीचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गडचिरोलीत असे अनेक शांतपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचा गौरव व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे महासचिव अजित नाथानी यांचा ‘गडचिरोली गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना अजित नाथानी यांनी गडचिरोलीकरांचे प्रेम, जिव्हाळा आणि पालकांचे आशीर्वाद यामुळेच समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. हा पुरस्कार आपण वडील हमीद नाथानी यांना समर्पित करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या वडिलांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्रेस क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करत पत्रकार समाजातील सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करून समाजात सलोखा आणि बांधिलकी वाढविण्याचे कार्य होत असल्याचे सांगितले.democracy पत्रकार आपल्या लेखणीतून समाजाला दिशा देत असल्याने विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही नमूद करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले. सत्कारमूर्तींचा परिचय, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला पत्रकार, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पत्रकार दिनानिमित्त प्रेस क्लबच्या वतीने आयोजित गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.