कारंजा (घा.)
savitrimai-phule-jayanti : क्रांतीज्योती सावित्रीमाई जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कारंजा कला क्रीडा अकादमी, गुरुकुल पब्लिक स्कूल आणि माळी महासंघ कारंजा तसेच शहरातील दानदात्यांच्या सहकार्याने स्व. मन्नालाल मातादिन अग्रवाल सभागृहात शहरातील स्वयंपाक, धुणी-भांडी व झाडूपोछा घरकाम करणार्या १०१ सावित्रींच्या लेकींचा प्रथमच भव्यदिव्य असा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी आमदार सुमित वानखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून मराठी चित्रपट यशवंतचे दिग्दर्शक, जुना फर्निचर चित्रपटाचे सहकलाकार पीयूष भोंडे, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमल गवई, मिशन आयएएसचे संचालक डॉ. प्रा. नरेशचंद्र काठोळे, विद्या काठोळे, जिपच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे, ठाणेदार अनिल मेश्राम यांची उपस्थिती होती.
शहरात प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे आयोजन होत असल्याचे आमदार सुमित वानखेडे यांनी सांगितले. सावित्रीबाई ही महिलांसाठी एक प्रेरणादायी आदर्श असल्याचे डॉ. कमल गवई यांनी सांगितले. महिलांनी आपल्या मुलांना कलेटर बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत मिशन आयएएसचे नरेशचंद्र काठोळे यांनी व्यत केले. फुले दाम्पत्यांनी विविध सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले, असे विचार पीयूष भोंडे यांनी व्यत केले.
यावेळी पुष्पगुच्छ, पुस्तक, सन्मानचिन्ह तसेच साडीचोळी व स्मृतिचिन्ह भेट देऊन घरकाम करणार्या लेकींचा सन्मान करण्यात आला. मी सावित्री बोलतेय ही नाट्यछटा सादर करणारी गुरुकुल पब्लिक स्कूलची धनश्री जत्ती व सावित्री-जोतिबा यांची सुंदर रांगोळी साकारणारे वैष्णवी घिमे व आदित्य या युवा कलाकारांना तर स्वागत गीत व सावित्रीबाईवर गीत सादर करणार्या आणि दान दात्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात सेवा दिलेल्या स्व. भारती प्रकाश धारपुरे व स्व. नीलिमा राजेश जोरे, स्व. प्रा. वंदना अशोक पराडकर स्मृतीप्रित्यर्थ सन्मानचिन्ह देण्यात आले.
प्रास्ताविक व परिचय आयोजक विलास वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन शरद बोके यांनी केले. संचालन जया ठोंबरे यांनी केले. यशस्वीतेसाठी आयोजक विलास वानखडे, अजय भोकरे, संजय कदम यांच्या पुढाकाराने गुरुकुलचे शरद बोके, आशिष मानकर, माळी महासंघाचे नितीन बनकर, सुदर्शन चरपे, कारंजा कला क्रीडा अकादमीचे प्रा. सतीश काळे, अनिस मुल्ला यांनी सहकार्य केले.