नागपूर,
solar-power-project : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती आणि वापर वाढवण्यात आला आहे. अजनी, नागपूर, आमला आणि वर्धा या मोठ्या जंक्शनमध्ये मोठ्या क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून, शेकडो टन कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जनात घट होत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
रेल्वेकडून प्रदूषण राखण्यासाठी हरित उर्जेवर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यावरण राखण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील विविध रेल्वे स्थानके, कार्यालये, तसेच सेवा इमारतींमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांची मोठ्या अंमलबजावणी केली आहे. नवीकरणीय वापर वाढवणे, कार्बन फुटप्रिंट कमी करणे आणि पर्यावरणपूरक रेल्वे संचालनाला चालना देण्याचे यातून प्रयत्न केले जात आहे.
२३४१.५८ केडब्ल्यूपी क्षमतेचे सौर पॅनेल्स
नागपूर विभागात सौर ऊर्जा प्रकल्पांची एकूण मंजूर क्षमता ३१४० किलो वॅट पॉवर (केडब्ल्यूपी) आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान २३४१.५८ केडब्ल्यूपी क्षमतेचे सौर पॅनेल्स करण्यात आले अजनी, नागपूर, आमला आणि वर्धा या प्रमुख ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. सोबतच रेल्वेची प्रशासकीय कार्यालये, डेपो, प्रशिक्षण केंद्रे, आरोग्य युनिट्स तसेच इतर रेल्वे आस्थापनांमध्येही सौर प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
७७५ टन कोळशाची बचत
गेल्या वर्षभरात उभारण्यात आलेल्या सौर प्रकल्पांमुळे सुमारे १.५५ गिगावॅट-तास ऊर्जेचे उत्पादन झाले आहे. परिणामी १२७१ टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट झाल्याचा रेल्वेचा दावा आहे. ही कामगिरी सुमारे ५.८४ लाख वृक्षांचे संरक्षण आणि सुमारे ७७५ टन कोळशाची बचत याच्या समतुल्य असल्याचेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. भारतीय रेल्वेच्या नेट-झिरो कार्बन उत्सर्जनाच्या टार्गेटला नजरेसमोर ठेवून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने सौर उर्जेचा निश्चिंत केला आहे.