नागपूर,
nagpur-garden-club-flower : नागपूर गार्डन क्लबच्या वतीने शहरातील निसर्गप्रेमींसाठी १२३ वे वार्षिक फुलांचे प्रदर्शन रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. कुसुमताई वानखेडे हॉल, नॉर्थ अंबाझरी रोड, नागपूर येथे सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या आस्था कार्लेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ११.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात निसर्गसौंदर्याची नेत्रदीपक मांडणी पाहायला मिळणार असून विविध प्रकारच्या फुलांची आणि रोपांची रेलचेल असणार आहे. गुलाब, ग्लॅडिओलाय, आकर्षक फुलांची सजावट, इनडोअर रोपे, कॅक्टस व सुक्युलंट्स, तसेच बोन्साय रोपे यांचे खास प्रदर्शन या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग, पर्यावरण आणि बागकामाविषयी प्रेम व कुतूहल निर्माण व्हावे, या उद्देशाने फुलांची रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती नागपूर गार्डन क्लबच्या अध्यक्षा अनुजा परचुरे यांनी दिली.
यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष डॉ. राजश्री बापट व सहसचिव रेखा देशमुख उपस्थित होत्या. निसर्गप्रेमी, बागकामप्रेमी, विद्यार्थी आणि नागपूरकरांनी या फुलांच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन नागपूर गार्डन क्लबतर्फे करण्यात आले आहे.