पोलिस वर्धापन दिनानिमित्त मारेगाव येथे जनजागृती उपक्रम

विद्यार्थ्यांना पोलिस कार्यप्रणाली व कायद्याची माहिती

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव,
police-anniversary-maregaon : पोलिस वर्धापन दिनाचे औचित्य साधून मारेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने समाजप्रबोधन व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, मारेगाव येथील विद्यार्थ्यांना पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
 
y7Jan-Wardhapan
 
 
कार्यक्रमात पोलिस ठाण्यामधील दैनंदिन कार्यपद्धती, तक्रार नोंद प्रक्रिया, गुन्ह्यांचा तपास तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची भूमिका याविषयी माहिती देण्यात आली. यासोबतच महिला विषयक कायदे, सायबर गुन्हे, गुडटचबॅडटच, बालसुरक्षा, नवीन कायदे व कायद्यातील बदल यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन मदतीसाठी 112, महिलांसाठी 1091 व बालहेल्पलाईन 1098 या क्रमांकांची माहितीही देण्यात आली.
 
 
विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवत कायद्याविषयीच्या शंका दूर केल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढून पोलिस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
 
 
हा कार्यक्रम मारेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात झाला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक दीपक गावंडे, शंकर बारेकर, नामदेव भटारकर, कपिल जीवने, राजन इसलकर तसेच इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.