तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
savitribai-phule-statue-incident : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने हटविल्या प्रकरणाची दखल घेत महात्मा फुलेंचे पाचवे वंशज नीता होले (फुले) पुणे येथून यवतमाळात दाखल झाल्या होत्या. त्यांनी या प्रकरणी प्रशासनाला निवेदन सादर केले. या घटनेचा निषेध नोंदवित पुतळा हटविलेल्या ठिकाणीच सावित्रीबाईंचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या विषयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
यवतमाळातील स्टेट बँक चौकात 2 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याला सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस अधीक्षक व मुख्याधिकाèयांनी 2019 मध्ये ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले होते. यामुळे सावित्रीबाई फुले यांचा पुतळा काही नागरिकांनी बसविला. मात्र प्रशासनाने रात्रीतून हा पुतळा हटविला. यामुळे सावित्रीबाई फुले यांचे असंख्य अनुयायी दुःखी झाले. सावित्रीबाई फुलेंचा पुतळा या ठिकाणी पुन्हा बसविण्याची मागणी केली.
या विषयाचे निवेदन सादर करताना सविता हजारे, माया गोरे, प्रमोदिनी रामटेके, माधुरी नाल्हे, डॉ. दिलीप घावडे, प्रा. अंकुश वाकडे, संजय बोरकर, वैशाली हिरे, स्नेहा डोंगरे, प्रा. दीपक वाघ, अशोक तिखे, किशोर कावलकर, प्रा. सविता हजारेसह अनेकजन उपस्थित होते.