गोंडपिपरी,
tiger-attack-incident : धाबा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्याचा बनावट प्रकार उघडकीस आला. मानव-वन्यजीव संघर्षाच्या नावाखाली शासनाची नुकसान भरपाई मिळविण्याचा प्रयत्न करणार्या शिकारी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, तपासात धक्कादायक सत्य समोर आले आहे. मध्यचांदा वनविभागाच्या पथकाने 5 जानेवारी रोजी धाबा वनपरिक्षेत्रातील गोजोली राखीव वनक्षेत्रात ही कारवाई केली.

स्थानिक शिकार्यांच्या टोळीने जंगलात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी बेकायदेशीररित्या जिवंत विद्युत तारा टाकल्या होत्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू हनुमंत मोहुर्ले (रा. गोजोली) याने चौकशीदरम्यान कबूल केले की, 21 डिसेंबर 2025 रोजी तो आणि त्याचे साथीदार चक्रधर परशुराम मोहुर्ले व अन्य एक जण शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात गेले होते. विद्युतीकरण केलेल्या तारांची पाहणी करीत असताना अचानक वाघाशी त्यांचा सामना झाला. गोंधळाच्या परिस्थितीत चक्रधर मोहुर्ले पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना वाघाने त्याच्यावर मागून हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आणि जंगलात पसार झाला. मात्र, सत्य समोर येऊ नये म्हणून आरोपींनी वाघाचा हल्ला वेगळ्या ठिकाणी झाल्याचा खोटा दावा केला. जखमी शिकार्याला निष्पाप मानव वन्यजीव संघर्षाचा बळी दाखवून शासनाकडून भरपाई मिळविण्याचा त्यांचा डाव होता.
मात्र, उपवनसंरक्षक योगेश वाघाये यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या सखोल क्षेत्रीय तपासणीत आरोपींनी दाखविलेल्या ठिकाणी वाघांचे पगमार्क, हालचालींचे कोणतेही संकेत अथवा प्रादेशिक चिन्हे आढळली नाहीत. त्यामुळे संशय बळावला आणि अखेर सखोल चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे वन्यजीव गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम, उपवनसंरक्षक योगेश वाघाये आणि साहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून, सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे