वर्धा,
wardha-news : रस्ते विकास, सौंदर्यीकरणांसह इतर कामांचा विषय पुढे येताच सर्वात आधी फेरीवाल्यांसह रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमीत दुकानदारांना मोठी धडकीच भरते. या विकास कामांमुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी गाडीच थांबते. प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा मिळताच अधिकार्यांना निवेदनासह आंदोलनाचा पवित्राही घेतला जातो. अनेकवेळा पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविल्या जाते. मात्र, याला शिवाजी चौकातील अतिक्रमण अपवाद ठरले आहे. ना पोलिस, ना कुठला दबाव, जवळपास ५० अतिक्रमीत दुकानदारांनी स्वेच्छेने अतिक्रमीत दुकाने हटवून प्रशासनाला साथ दिली आहे.

अर्थसंकल्पात मंजूर वर्धा-वायगाव-कापसी हा ५५ किमीचा रस्त्याचे काम करण्यात आले. या कामाला २०२४ मध्ये कार्यारंभ मिळाला. ही कामे २०२६ पर्यंत पूर्ण करावयाची आहेत. ब्युटिफिकेशनअंतर्गत रेलींग सीसी, ड्रेन, पेव्हींग ब्लॉक तसेच नाल्यावर संरक्षण भिंतीचे कामं व्हायची आहेत. शहरातील शिवाजी चौक ते आदित्य मेडिकलपर्यंत ८० मीटरच्या सिमेंट नालीचे बांधकाम करायाचे आहेत. मात्र, याठिकाणी मागील ५० ते ६० वर्षांपासून दुकानदार येथे असून याच्या भरवश्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. हार-फुलांची दुकाने, पानठेले, चहा टपरी, वाजंत्री, हॉटेल अशी अनेक दुकाने आहेत. शहरातील सौंदर्यीकरणाचा विषय पुढे आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास ५० अतिक्रमीत दुकानदारांना नोटीस पाठविली. सात दिवसात अतिक्रमण हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या. काही काळासाठी या दुकानदारांमध्ये मोठा रोष दिसून आला. मात्र, विकास कामांना अडथळा नको म्हणून अतिक्रमणधारकांनी स्वेच्छेने हे अतिक्रमण काढले.
या अंतर्गत छत्रपती शिवाजी चौक ते आदित्य मेडिकलपर्यंत ८० मीटरची सिमेंट काँक्रिट नालीचे काम करण्यात येणार आहे. शिवाजी चौकातून पुढे असलेला मोठा नाला सिमेंट काँक्रिटचा बनवून त्यावर संरक्षण भिंतही बांधण्यात येणार आहे. नालीसह पेव्हिंग ब्लॉक, रेलींगचे काम होत असल्याने अतिक्रमणधारकांनी स्वेच्छेने आपआपली अतिक्रमण काढली. जवळपास ७.३० कोटीतून ही कामं केली जाणार असून एक-दोन दिवसात या कामांना गती मिळणार असल्याचे संबंधित अधिकार्याने सांगितले आहे.