कारंजा (घा.),
theft-case : कारंजा (घा.) शहर गेल्या दोन तीन महिन्यांपासुन गुन्हेगारीमध्ये आघाडी घेताना दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी ३ लाख रुपये लंपास करणार्या चोरट्यांचा सुगावा लागण्यापूर्वी येथे पुन्हा ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना आज ७ रोजी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील धनराज भांगे (७०) यांनी आज ७ रोजी दुपारी १२.३० वाजता ४० हजार रुपये भारतीय स्टेट बँक शाखा कारंजा येथून काढले. तेथून वीज बिल भरणा करून भाजीपाला खरेदी करून पंचाय समिती चौकातून घरी पायी जात होते. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी भांगे यांच्या हातातील ४० हजार रुपये असलेली पिशवी हिसकावत धूम ठोकली. भर चौकात आणि भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ४० हजाराची पिशवी लंपास केल्याचे लक्षात येताच भांगे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मादक पदार्थाच्या घटनेनंतर येथे पोलिस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला लगाम बसेल, अशी शहरातील सर्व नागरिकांची आशा आहे. चार महिन्यापूर्वी भरदिवसा ३ लाख रुपये रस्त्यावरून चोरट्यांनी लंपास केले होते. त्या प्रकरणातील चोरट्यांचा अद्याप शोध लागला नसताना पुन्हा तशीच घटना घडल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.